सातारा Durga Procession In Satara : दुर्गादेवीच्या मिरवणुकीत ट्रॅक्टर ट्रॉलीमध्ये ठेवलेल्या जनरेटरचा स्फोट होऊन 8 मुलं भाजून गंभीर जखमी झाली आहेत. ही घटना महाबळेश्वरमध्ये मंगळवारी रात्री घडली. आता या घटनेचं सीसीटीव्ही फुटेज समोर आलं आहे. त्यामध्ये स्फोटानंतर जनरेटरनं घेतलेला पेट आणि नागरिकांची पळापळ स्फोटाची भयावहता दाखवते.
अंगावरील कपड्यांनी घेतला पेट :स्फोट झाल्यानंतर जनरेटरनं पेट घेतला. त्यामुळे आजुबाजुला असणाऱ्या मुलांच्या अंगावरील कपडे पेटले. त्यामुळे आठ मुलं भाजून गंभीर जखमी झाली. त्यांना साताऱ्यातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. कोणाचं तोंड तर कोणाची पाठ भाजली आहे. जखमी मुलं आणि मुली आठ ते दहा वयोगटातील आहेत. तीन मुलं जास्त भाजली आहेत. त्यांना पुण्याला हलवलं आहे. या घटनेमुळे दुर्गादेवीच्या मिरवणुकीला गालबोट लागलं आहे.
जनरेटरच्या पाईपमधून पेट्रोल गळती :महाबळेश्वर इथं मंगळवारी रात्री दुर्गादेवीची सवाद्य मिरवणूक सुरू होती. ट्रॅक्टर ट्रॉलीमधील जनरेटरचा भीषण स्फोट झाला. यामध्ये आसपास असलेली आठ मुलं आणि मुली भाजून गंभीर जखमी झाली. तोंड आणि पाठ भाजल्यानं त्यांना साताऱ्यातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. जनरेटरच्या पाईपमधून पेट्रोलची गळती होऊन जनरेटरचा स्फोट झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.