सातारा -आचारसंहिता भंग प्रकरणी दाखल केलेल्या तक्रारीवरून फलटणचे आमदार दीपक चव्हाण, विश्वजीतराजे नाईक निंबाळकर आणि राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष मिलिंद नेवसे यांच्यासह ४० ते ५० जणांवर फलटण शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फलटणमध्ये आमदार दीपक चव्हाणांसह इतरांवर आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल हे ही वाचा -युती व आघाडीत मोठा पेच; मुंबईतील हे नगरसेवक आहेत विधानसभेसाठी इच्छुक
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांनी जमावबंदी आणि शस्त्र बंदी लागू केलेली आहे. फलटण शहरातील नाना पाटील चौक, शिवाजी चौक, आंबेडकर चौक, राम मंदिर, डेक्कन चौक या परिसरात बुधवारी २५ सप्टेंबरला सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास आमदार चव्हाण, विश्वजीतराजे निंबाळकर, शहराध्यक्ष मिलिंद नेवसे यांनी त्यांच्या चाळीस ते पन्नास सहकाऱ्यांना घेऊन व्यापाऱ्यांना दुकाने बंद करण्यास भाग पाडले. महाराष्ट्र राज्य सहकारी बँक घोटाळ्यात राष्ट्रवादी कॉंग्रेस अध्यक्ष शरद पवार यांच्यावर गुन्हा दाखल झाल्याने त्या विरोधात फलटण बंदचे आवाहन करण्यात आले होते. या प्रकरणी आचारसंहितेचा भंग झाल्याने ही कार्यवाही करण्यात आलेली आहे. त्यांच्या विरोधात फलटण नगर परिषदेचे नगरसेवक अनुप शहा यांनी फलटण शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती.
हे ही वाचा -रविकांत तुपकर यांच्या राजीनाम्यानंतर शेट्टींना धक्का, राजीनाम्यानंतर काय म्हणाले तुपकर?