कराड (सातारा) -विजापूर-गुहागर राज्यमार्गाला राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा मिळाल्यानंतर या महामार्गावर कराड-कोयनानगर (घाटमाथा) दरम्यानच्या रस्त्याचे रूंदीकरण, मजबुतीकरणासह काँक्रिटीकरणाला दीड वर्षापूर्वी सुरूवात झाली. मात्र, कासवगतीमुळे या मार्गावरील अनेक कामे अर्धवट स्थितीत आहेत. तसेच संपूर्ण मार्ग खड्डेमय झाला आहे. खड्डे आणि धुळीमुळे कराड-पाटण मार्गाने प्रवास करणारे वाहनधारक वैतागले आहेत. त्यामुळे बर्याच वाहनधारकांनी वाट वाकडी करून तांबवे, मरळी, मोरगिरीमार्गे थेट हेळवाकहून पुढे कोकणात जाण्याचा मार्ग शोधला आहे.
वाहनांच्या नुकसानीबरोबरच शारीरिक त्रास -
विजापूर-गुहागर मार्गाने थेट कोकणात प्रवेश करता येतो. पश्चिम महाराष्ट्रातील अनेक शेतकरी आपला भाजीपाला याच मार्गाने विक्रीसाठी कोकणात घेऊन जातात. तसेच कोकणातील बंदरावरून मासे घेऊन येणारी वाहने याच मार्गावरून सातारा, सांगली, मिरज भागात येतात. चिपळूण, रायगड, रोहा येथे मोठ्या केमिकल कंपन्या असल्यामुळे टँकर, कंटेनरसारखी अवजड वाहने या मार्गावरून ये-जा करतात. या सर्व परिस्थितीमुळे विजापूर-गुहागर हा वर्दळीचा मार्ग समजला जातो. राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा मिळाल्यानंतर विजापूर-गुहागर दरम्यानच्या मार्गाचे रूंदीकरण, मजबुतीकरण आणि काँक्रिटीकरण सुरू झाले. परंतु, संथगतीमुळे रस्त्याच्या कामाला खूप विलंब झाला आहे. रस्त्यातील छोट्या पुलांची, मोर्यांची कामे अर्धवट आहेत, अशा ठिकाणी वाहतूक वळविण्यात आली आहे. पूर्वीचा डांबरी रस्ता उकरण्यात आला आहे. त्यावर मातीचा भराव टाकला असल्याने धुरळा उडत आहे. तसेच रस्त्यात मोठे खड्डे पडल्याने वाहनांची धडधड वाढली आहे. वाहनांच्या नुकसानीबरोबरच वाहनधारकांचा शारीरिक त्रास देखील वाढला आहे.
गेल्या दीड वर्षात अनेक वाहनांचा अपघात -