सातारा -महाराष्ट्राची वरदायिनी असलेल्या कोयना धरण पाणलोट क्षेत्रात पावसाची संततधार आहे. पाणीसाठा देखील झपाट्याने वाढत आहे. असे असताना कोयना विद्युत प्रकल्पातील वीजनिर्मिती बंद करण्यात आली आहे. वीजनिर्मितीनंतर पाणी वशिष्ठी नदीला जाऊन चिपळूणला पुराचा धोका आणखी वाढू शकतो. म्हणूनच वीजनिर्मिती बंद ठेवण्यात आली असल्याची माहिती वीज प्रकल्पाचे मुख्य अभियंता संजय चोपडे यांनी दिली आहे.
वीजनिर्मितीनंतर वाहून जाणारे पाणी चिपळूणच्या वशिष्ठी नदीला जाऊन मिळते. वशिष्ठी नदी धोका पातळीपर्यंत वाहत आहे. त्यात कोयनेच्या वीजनिर्मितीचे पाणी सोडल्यास पुराचा धोका वाढू शकतो. म्हणून कोयना प्रकल्पातील वीजनिर्मिती बंद ठेवण्यात आली आहे. - संजय चोपडे, मुख्य अभियंता
वशिष्ठी नदी दुथडी -चिपळूण शहरातील सखल भागात पाणी भरण्यास सुरूवात झाली आहे. वशिष्ठी नदी व शिव नदी दुथडी भरुन वाहत आहेत. मंगळवारपासून मुसळधार पाऊस पडत आहे. पुढील चार दिवस मुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. वशिष्ठी नदीचे पाणी धोका पातळीपर्यंत वाढले आहे. त्यामुळे चिपळूणला पुराचा धोका संभवत आहे.
वीजनिर्मिती होऊन पाणी जाते वशिष्ठीला -सिंचन आणि पिण्यासाठी पूर्वेकडे पाणी सोडताना पायथा वीजगृहात वीजनिर्मिती करून ते कोयना नदीपात्रात सोडले जाते. त्याचप्रमाणे १ ते ४ या टप्प्यांमध्ये वीजनिर्मितीनंतर वाहून जाणारे पाणी चिपळूणच्या वशिष्ठी नदीला जाऊन मिळते. सध्या वशिष्ठी नदी धोका पातळीपर्यंत वाहत आहे. त्यात कोयनेच्या वीजनिर्मितीचे पाणी सोडल्यास पुराचा धोका वाढू शकतो. म्हणूनच कोयना प्रकल्पातील वीजनिर्मिती बंद ठेवण्यात आली आहे.