सातारा -जिल्ह्याच्या पश्चिमेला अतिवृष्टीमुळे नद्या दुथडी भरुन वाहत आहेत, तर पूर्वेकडील भागात पाऊस नसल्याने माणगंगा नदी कोरडी कोरडी आहे. सततच्या मुसळधार पावसामुळे जिल्ह्याच्या पश्चिमेला पूर परिस्थितीमुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. कोयना व जिल्ह्यातील इतर अनेक धरणांतून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू आहे. त्यामुळे अनेक नद्यांना पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे.
जिल्ह्यातील दुष्काळी माण-खटावला यावर्षीही वरुणराजाची अवकृपा दिसत आहे. त्यामुळेच कृष्णेचे मोठ्या प्रमाणात वाहून जाणारे पाणी माणला देण्याची मागणी जोर धरत आहे. सातारा, सांगली, कोल्हापूरात संततधार पाऊस पडत आहेत. कृष्णा, वारणा, पंचगंगा नद्या दुथड्या भरुन वाहत असताना माणगंगा नदीत पाणी नाही. आजही छावणीवर येथील जनावरे व माणसं जगत आहेत. सलग २ वर्षापासून पावसाने हुलकावणी दिल्याने येथील बळीराजा चिंतेत आहे.
माण- खटावमधील पावसाच्या परिस्थितीचा आढावा घेताना ईटीव्ही भारतचे सातारा प्रतिनिधी पशुधन वाचवण्यासाठी हालअपेष्टांचा सामना करत माणदेशी माणसं चारा छावणीवर दिवस काढत आहेत. जिल्ह्याच्या पश्चिमेला पावसाने थैमान घातले असून जनजीवन विस्कळीत झाले आहे. या भागातील सर्व नद्या, धरणे भरुन वाहू लागली आहेत. मुसळधार पावसाने अनेक गावांचे संपर्क तुटत आहेत. प्रशासन धोक्याच्या सूचना देत आहे. अनेक जण नदीला व ओढ्याला आलेल्या पाण्याने वाहून जात आहेत. पश्चिमेकडे अशी स्थिती असताना पूर्वेकडील तालुक्यात मात्र, नद्या, नाले, ओढे आणि तलाव पाऊस नसल्याने कोरडेठाक आहेत.
माण तालुक्यातील उगमस्थान असणारी माणगंगा नदी मागील १० वर्षापासून दुथडी भरुन वाहत नसल्याने या भागातील जनतेला वारंवार दुष्काळी परिस्थितीला सामोरे जावे लागत आहे. सध्या ऑगस्ट महिना सुरू झाला तरी विहिरी, नाले, कोरडे पडले आहेत. पावसाअभावी तालुक्यातील उद्योगधंद्यावरही मोठा परिणाम झाला असून येथील उद्योग चांगलेच मंदावले आहेत.