सातारा- भीषण दुष्काळी परिस्थितीत टेंभूचे पाणी माण तालुक्याला मिळाले आहे. या पाण्यामुळे माणदेशातील सोळा गावांचा पाणीप्रश्न सुटला आहे. या पाण्यामुळे ओढ्यावरती असणारे तलाव, बंधारे भरून वाहू लागले आहेत. 2003 मध्ये म्हणजे सोळा वर्षांपूर्वी 16 गावांतील लोकांनी तहसील कार्यालयासमोर आंदोलन करून पाण्याची मागणी केली होती. याला तब्बल सोळा वर्षांनी यश आले आहे.
आशादायक; दुष्काळी माण तालुक्यातील गावांना सोळा वर्षांनंतर मिळाले टेंभूचे पाणी - पाणी
विरळी, बागलवाडी, आटपाडकर वस्ती, पांडेवाडी शेनवडी, कासरवाडी, बनगरवाडी, वरकुटे मलवडी, खरातवाडी, कुरणेवाडी 16 गावांचा कुठल्याही पाणी योजनेत समावेश नव्हता. तब्बल १६ वर्षानंतर या गावाला पाणी मिळाले आहे.
माण तालुक्यातील पूर्वेकडील दुर्लक्षित व अतिदुष्काळी भाग म्हणजे विरळी, बागलवाडी, आटपाडकर वस्ती, पांडेवाडी शेनवडी, कासरवाडी, बनगरवाडी, वरकुटे मलवडी, खरातवाडी, कुरणेवाडी 16 गावांचा कुठल्याही पाणी योजनेत समावेश नव्हता. या भागात दुष्काळाची परिस्थिती असतानाच आपल्या जिल्ह्यातील पाण्याने लगतच्या सांगली जिल्ह्यातील कालवा भरून वाहत होता. त्या पाण्याकडे पाहण्याशिवाय माणदेशी जनतेसमोर कोणताही पर्याय नव्हता. हे पाणी मिळाले तरी आपला दुष्काळ संपेल, अशी आशा येथील जनतेची होती. त्यासाठी अनेक आंदोलने करण्यात आली, सतत संघर्ष करण्यात आला. पण त्यात यश आले नाही.
अनिल देसाई यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर त्यांनी पाण्याच्या मागणीसाठी महसूल मंत्री यांच्याकडे मागणी केली होती. त्यांनी देण्याचे आश्वासन महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी मार्च 2018 रोजी दिले होते. त्यानंतर माणमधील सोळा गावांना पिण्याच्या पाण्यासाठी टेंभूचे पाणी देण्याच्या योजनेला प्रशासकीय मान्यता देण्यात आली. 13 महिन्यात ही योजना पूर्णत्वास गेली. सध्या माण तालुक्यातील तलाव, बंधारे भरत महाबळेश्वरवाडी तलावाच्या दिशेने पाणी गेले आहे. या पाण्यामुळे काळचौंडी व परिसरातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटला आहे.