कराड (सातारा) - कराड विमानतळाचे विस्तारीकरण लादल्यामुळे विस्तारवाढीविरोधात लढा देणार्या श्रमिक मुक्ती दलाने कराड दक्षिण विधानसभा मतदार संघातील अपक्ष उमेदवार अॅड. उदयसिंह पाटील-उंडाळकर यांना पाठिंबा जाहीर केला.
श्रमिक मुक्ती दलाच्या नेतृत्वाखाली काम करणार्या विमानतळ विस्तारवाढ विरोधी कृती समितीसह सर्व संघटना कराड दक्षिणचे अपक्ष उमेदवार अॅड. पाटील यांचे काम करणार असल्याच माहिती श्रमिक मुक्ती दलाचे नेते डॉ. भारत पाटणकर यांनी कराड येथे पत्रकार परिषदेत दिली. ते म्हणाले, "श्रमिक मुक्ती दल ही संघटना वारकरी संतांची संस्कृती व परंपरा मानणारी संघटना आहे. आमच्याकडे जातीयवादी पक्ष व संघटनांना थारा नाही. कराड दक्षिण विधानसभा मतदार संघ वगळून सातारा जिल्ह्यासह राज्यात आम्ही काँग्रेस व राष्ट्रवादीच्या उमेदवारांना पाठिंबा दिला आहे. त्यासाठी समन्यायी पाणी वाटप, आटपाडी पॅटर्न, लोकशाहीची अंमलबजावणी, विजयी झाल्यानंतर भाजप-सेना अशा जातीयवादी पक्षात जाणार नाही, यासह श्रमिक मुक्ती दलाच्या न्यायीक लढ्यांना पाठींबा देण्याच्या मुद्यांवर आम्ही पाठिंबा दिला आहे. "
"कराड दक्षिणमधील काँग्रेसचे उमेदवार आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी मुख्यमंत्री असताना कराड विमानतळ विस्तारवाढ चुकीच्या पध्दतीने शेतकर्यांवर लादली आहे. भाजप उमेदवाराने त्यांच्या जाहीरनाम्यात विमानतळ विस्तार केला जाणार असल्याचे नमुद केले आहे. परंतु, त्यांच्या जाहीरनाम्याशी आम्हाला देणे-घेणे नाही. कारण, आम्ही कदापी जातीयवादी पक्षाबरोबर जाणार नाही. म्हणून कराड दक्षिणचे अपक्ष उमदेवार अॅड. उदयसिंह पाटील-उंडाळकर यांना आम्ही पाठींबा देत आहोत," असे ते म्हणाले.
'विमानतळ विस्तारवाढ लादून वारूंजी, मुंढे, गोटे, केसे, पाडळी या गावातील शेतकरी भुमीहीन करण्याचा घाट घातला गेला आहे', असे सांगून ते म्हणाले, ''विस्तारवाढ रद्द करणे, कासारशिरंबे पाणी योजनेतील बाधित शेतकर्यांचा लढा, ओंड, ओंडोशी, उंडाळे भागातील शेतकर्यांना पाणी मिळण्यासाठी उभारलेल्या लढ्याला पाठिंबा द्या'', अशा मागण्या आम्ही केल्या. आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी त्या नाकारल्या. अपक्ष उमेदवार अॅड. उदयसिंह पाटील-उंडाळकर यांनी आम्ही श्रमिकच्या विचारांचेच असून सर्व लढ्यांमध्ये श्रमिक मुक्ती दलासोबत राहण्याचा शब्द दिल्याने त्यांना पाठिंबा जाहीर करत असल्याचे डॉ. पाटणकर यांनी सांगितले.