सातारा - भारतीय थोर परंपरेत श्रावण महिना अंत्यत पवित्र मानला जातो. अध्यात्म आणि आरोग्य यांचा जवळचा समन्वय आहे. शिवशंकर पिंडीस पाणी घालणे, बेलफुल, दवणा वाहणे हे महत्वपूर्ण समजले जाते. प्रतिवर्षी श्रावण महिनाभर शिंगणापूर येथे शिवभक्तांची रीघ असते. कारण, श्रावणमासात शिंगणापूरच्या शंभू महादेवाचे दर्शन म्हणजे कोथलगिरी प्रदक्षिणाच मानली जाते.
समुद्रसपाटी पासून सुमारे १०५० इतकी उंची शिंगणापूर डोंगराची आहे. शिंगणापूर डोंगर पायथ्याला कोथळे गाव वसलेले आहे. त्यामुळे या शंभू महादेव डोंगरास कोथलगिरी पर्वत म्हणतात. मुख्य मंदिरात माता पार्वती आणि देवधिदेव शंकर यांचे अस्तित्व आहे असे मानले जाते. १२८० दरम्यान राजा सिंघणं याने हे गाव वसविल्याची आख्यायिका आहे.
काय आहे दंतकथा?
शंकर-पार्वती या ठिकाणी सारीपाट खेळ खेळत असत. एकदा त्यांनी पण लावून खेळ खेळला, जो या खेळात हरेल त्याने सर्वसंग परित्याग करायचा. हे सर्व सोडून निघून जायचे असे ठरले. उत्तररात्री चाललेल्या खेळामध्ये माता पार्वती विजयी झाल्या. त्यामुळे, महादेव जंगलात निघून गेले. दोघांमध्ये विरह निर्माण झाला. मातापर्वतीने महादेवांचा शोध घेण्यास प्रारंभ केला. तेव्हा आठ ठिकाणी महादेवांनी पार्वती मातेला दर्शन दिले. त्याची साक्ष म्हणून आजही शंभू महादेव मुख्य मंदिरा सभोवती अष्ठलिंग आहेत.