सातारा Fadnavis Criticizes Thackeray :भाजपाचे सातारा लोकसभा प्रभारी डॉ. अतुल भोसले यांनी आयोजित केलेल्या कृषी प्रदर्शनाच्या उद्घाटनप्रसंगी बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी जोरदार फटकेबाजी केली. (Uddhav Thackeray) नामोल्लेख टाळून उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांना फडणवीसांनी मोकाट रेडे म्हटले. तसंच इथल्या कृषी प्रदर्शनात सर्वांत उंच बैल, दोन टनाचा रेडा असं बरंच काही आहे. आमच्याकडे मोकाट सुटलेल्या रेड्यांचा बंदोबस्त करण्याची काही योजना या प्रदर्शनात आहे का? असा खोचक सवाल त्यांनी केला. (Sanjay Raut)
रणजी नव्हे ही आयपीएलची टीम :दुरवस्था झालेल्या कराडच्या छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियमला उर्जितावस्थेत आणून तुमच्या उपस्थितीत रणजीची पहिली मॅच व्हावी, असं खासदार उदयनराजे भोसले आपल्या भाषणात म्हणाले होते. तो धागा पकडून फडणवीस म्हणाले की, राजे ही रणजीची टीम नाही. आयपीएलची टीम आहे. त्याचे मालक पण तुम्हीच आहात. त्यामुळं तुम्ही टीममध्ये आहातच. फक्त आम्हाला टीममध्ये ठेवा. फडणवीसांच्या या बोलण्यावर जोरदार हशा पिकला.
दुष्काळाचा कलंक पुसून टाकणार :कृष्णा-कोयनेवरील अपूर्ण प्रकल्प पूर्ण करण्याचं काम मोदी सरकारनं केलं आहे. आमदार जयकुमार गोरेंनी हाती घेतलेल्या कामांमुळे सातारा जिल्ह्यातील माण आणि खटाव या तालुक्यांवरील दुष्काळी हा शिक्का नक्की पुसला जाईल. सत्तेत असताना साखर उद्योगातील ज्या लोकांना निर्णय घेणे जमले नाही ते निर्णय मोदींनी घेतले, असं सांगत देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेस-राष्ट्रवादीच्या पश्चिम महाराष्ट्रातील नेत्यांवर टीका केली.