सातारा : कातडी कमावण्याचे काम करणाऱ्या लोकांची ढोरगल्ली, कुंभारांचा कुंभारवाडा, लोणार व्यावसायिकांची लोणार आळी, शिंपी आळी, मातंग वस्ती, इ. अशी गाव-गाड्यातून आलेली व्यवसायानुरुप नावे हद्दपार होणार आहेत. साताऱ्यातील या वसाहती लवकरच लोकनेते व महापुरुषांच्या नावाने ओळखल्या जाणार आहेत. मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आल्यानंतर नागरिकांनी याचे जोरदार स्वागत केले आहे. वस्त्यांचे जातीवाचक नाव बदलण्याचा महत्वपूर्ण निर्णय काल मंत्रिमंडळाच्या बैठकीत झाला. त्या अनुषंगाने आज 'ईटीव्ही भारत'ने साताऱ्यातील परिस्थितीचा आढावा घेतला.
जातीवाचक नावं होणार हद्दपार....मंत्रिमंडळाच्या बैठकीतील निर्णयाचे स्वागत - जातीवाचक नावं रद्द
कातडी कमावण्याचे काम करणाऱ्या लोकांची ढोरगल्ली, कुंभारांचा कुंभारवाडा, लोणार व्यावसायिकांची लोणार आळी, शिंपी आळी, मातंग वस्ती, इ. अशी गाव-गाड्यातून आलेली व्यवसायानुरुप नावे हद्दपार होणार आहेत. साताऱ्यातील या वसाहती लवकरच लोकनेते व महापुरुषांच्या नावाने ओळखल्या जाणार आहेत.
सातारा शहर हे छत्रपती शाहू महाराजांनी वसवलेलं शहर आहे. इतिहासात हे 'पहिलं सुनियोजित उभारलेलं शहर' अशी साताऱ्याची ओळख सांगितली जाते. शहर वसवताना तत्कालीन सोईसाठी व्यवसायानुरुप लोकांच्या वसाहती उभ्या राहिल्या. तत्कालीन समाजव्यवस्थेत हा व्यवसाय हीच त्या वसाहतींची ओळख बनली. या बलुतेदारांचा व्यवसाय हीच पुढे जात म्हणून उदयास आली असावी, असा अंदाज इतिहासकारांचा आहे. आज साताऱ्यात मल्हार पेठ येथील ढोर गल्ली, सदर बाजारातील शिंपी आळी, रविवार पेठेतील लोणार गल्ली, वेंकटपुरा पेठेतील न्हावी आळी, केसरकर पेठेत कुंभारवाडा या व अशा वस्त्या बोलीभाषेत जातीच्या नावाने ओळखल्या जातात.
केसरकर पेठेतील विद्या मनोहर कुंभार या गृहिणीने शासनाच्या नव्या निर्णयाचे स्वागत केले. समाधानकारक निर्णय असल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली. व्यंकटपुरा पेठेतील प्रसाद जाधव या युवकाने 'आता आम्हांला जातीवरून नव्हे, तर माणूस म्हणून ओळख मिळेल', असे म्हणत 'समाजात जातींवरून निर्माण होणारी फूट आमच्या पिढीला नको आहे', असे वक्तव्य केले.
संपूर्ण हिंदू समाज हा एकच आहे. केवळ व्यवसायावरून पुढे जाती, पोटजाती निर्माण झाल्याचे रविवार पेठेतील ज्येष्ठ नागरिक शंकर बापू चोरगे यांनी सांगितले. शासनाने घेतलेल्या निर्णयाचे स्वागत करत असल्याचे त्यांनी सांगितले. सदरबझारमधील सलिम बेपारी यांनी खाटीकगल्ली ऐवजी लोकपुरुषांच्या नावाने आमची वस्ती ओळखली जावी, असे सुचवले. 'नव्याने नामकरण करताना जातीजातीतील वाद निर्माण होणार नाही, याची काळजी सरकारला घ्यावी लागेल, अशी अपेक्षा मनोजकुमार तपासे यांनी व्यक्त केली.