सातारा - पाचगणी गिरीस्थानावर होम कॉरंटाईन केलेल्या मुंबईकर महिलेचा मृत्यू झाला आहे. प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून ती महिला राहत असलेला विभाग दक्षता म्हणून बॅरिकेटने बंद केला आहे. त्यामुळे पाचगणीकर धास्तावले आहेत. त्या महिलेचा रिपोर्ट चाचणीसाठी पाठवला आहे, अद्याप तो आलेला नाही.
पाचगणी शहरातील सिद्धार्थनगरमध्ये एक ६४ वर्षीय महिला 4 दिवसांपूर्वी वरळी, मुंबई येथून प्रवास करुन आली. तिला पालिका व आरोग्य विभागाने नियमाप्रमाणे गृह विलगीकरणात ठेवले होते. या महिलेचा काल (शुक्रवार) रात्री अचानक मृत्यू झाला. त्यामुळे पाचगणीत उलट सुलट चर्चा सुरू झाल्या. सर्व प्रशासन खडबडून जागे झाले आणि सिद्धार्थनगरात प्रांत, तहसीलदार, मुख्याधिकारी सर्वजण सकाळीच दाखल झाले. हा मृत्यू कशाने झाला? कोरोनाची लागन झाली होती काय? याबाबत तर्क वितर्क सुरू झाले. आरोग्य विभाग रोज या महिलेची तपासणी करत होते. परंतु, या महिलेचा दम्याच्या आजाराने व ह्दयविकाराने मृत्यू झाला असल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त होत असून संशयीत म्हणून या महिलेच्या घशातील स्त्रावाचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले असल्याचे वाईच्या प्रांताधिकारी संगिता चौगुले यांनी सांगितले.