महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

कोयना धरणग्रस्तांच्या त्यागामुळेच महाराष्ट्र सुजलाम सुफलाम - उपमुख्यमंत्री अजित पवार - karad dcm ajit pawar news

मागील वर्षी जुलै महिन्यात अतिवृष्टी होऊन भूस्खलन झाले. त्यामध्ये पाटण तालुक्यातील काही गावे बाधित आणि उध्दवस्त झाली. या गावांच्या पूनर्वसनासाठी पर्यायी जागा लवकरात लवकर शोधण्यात यावी, असे निर्देश उपमुख्यमी अजित पवार यांनी प्रशासनाला दिले. सध्या राज्यातील विकासकामांना गती देण्यात आली असून विकासकामांचा दर्जा उत्तम राखावा, अशी सूचना देखील त्यांनी केली.

dcm ajit pawar on  koyna dam victims  sacrifice at karad in satara district
उपमुख्यमंत्री अजित पवार

By

Published : May 19, 2022, 4:13 PM IST

कराड (सातारा) - धरणग्रस्तांनी कोयना प्रकल्पासाठी मोठा त्याग केला आहे. त्यांच्या त्यागामुळेच महाराष्ट्र सुजलाम सुफलाम झाला आहे. कोयना प्रकल्पग्रस्तांच्या प्रलंबित असणार्‍या प्रश्नांपैकी आम्ही काही अंशी प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला आहे. कोयना धरणाच्या 61 व्या वर्धापनदिनी बाधित शेतकर्‍यांना त्यांच्या स्वतःच्या नावाचा पुर्नवसन झालेला सातबारा देण्याचा शुभारंभ झाला. हे काम लवकरच पूर्ण होईल, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कोयाननगरमध्ये दिली. तसेच प्रकल्पग्रस्तांनी कोणत्याही शंका बाळगू नयेत. तुमच्या सर्वांच्या त्यागामुळे हे धरण उभं आहे. या धरणाच्या उभारणीत आपला त्याग मोठा आहे. तुम्ही खूप काही सोसलेले आहे. त्यांचे आज स्मरण करुन प्रत्येक प्रकल्पग्रस्तांना न्याय दिला जाईल, अशा शब्दही त्यांनी प्रकल्पग्रस्तांना दिला.

यशवंतराव चव्हाण, लोकनेते बाळासाहेब देसाईंचे मोठे योगदान -प्रकल्पग्रस्तांनी त्यांच्या जमिनी, गावठाणांच्या जागा दिल्यामुळे कोयना धरणाची निर्मिती झाली आहे. या निर्मितीमध्ये दिवंगत यशवंतराव चव्हाण व लोकनेते दिवंगत बाळासाहेब देसाई यांचे देखील मोलाचे योगदान आहे. कोयना धरणाच्या निर्मितीनंतर महाराष्ट्र प्रकाशमय झाला. प्रकल्पग्रस्तांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक असून त्यांचे प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावले जातील, असे उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले.

भूस्खलनातील गावांच्या पुनर्वसनासाठी पर्यायी जागा शोधा -मागील वर्षी जुलै महिन्यात अतिवृष्टी होऊन भूस्खलन झाले. त्यामध्ये पाटण तालुक्यातील काही गावे बाधित आणि उध्दवस्त झाली. या गावांच्या पूनर्वसनासाठी पर्यायी जागा लवकरात लवकर शोधण्यात यावी, असे निर्देश उपमुख्यमी अजित पवार यांनी प्रशासनाला दिले. सध्या राज्यातील विकासकामांना गती देण्यात आली असून विकासकामांचा दर्जा उत्तम राखावा, अशी सूचना देखील त्यांनी केली.

नौकाविहार सुरू करण्याचा प्रयत्न -गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई म्हणाले, कोयना प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न सोडविण्यासाठी सरकार दरबारी आम्ही वेळोवेळी बैठका घेतल्या. गेली अडीच वर्षे आम्ही महाविकास आघाडी सरकारमध्ये काम करत असताना आज जमिनीचे वाटप करण्याचा योग आला. माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर यांनी जसे प्रयत्न केले तसे मीही या प्रकल्पग्रस्तांसाठी प्रयत्न केले. लवकरात लवकर प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी आपण पाठपुरावा करणार आहोत. कोयनानगर परिसरात पर्यटन वाढीसाठी विविध विकासकामे करण्यात येत आहेत. तसेच कोयना जलाशयात पर्यटकांसाठी नौका विहार सुरु करण्याबाबत प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.

टाईमबॉन्ड दिल्याशिवाय अधिकारी कामे करणार नाहीत -माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर म्हणाले, डॉ. भारत पाटणकर यांनी कोयना प्रकल्पग्रस्तांची बाजू उचलून धरली. अनेक वर्षे पाटणकरांनी प्रयत्न केलेले आहेत. मी आमदार असताना पुनर्वसनाची कामे केली. मंत्री असताना बंद पडलेल्या प्रकल्पांची कामे पुर्णत्वास नेली. डॉ. भारत पाटणकरांच्या पुढाकाराने प्रकल्पग्रस्तांना एकत्रित करून त्यांना न्याय मिळवून दिला. त्याला आज यश आले आहे. प्रश्न मार्गी लावण्यात आज उपमुख्यमंत्र्यांनी सुरूवात केली आहे. परंतु, शेवटचा प्रकल्पग्रस्त असेल त्यालाही अशाच कार्यक्रमात सातबारा वितरण करु. कारण असा टाईमबाँन्ड दिल्याशिवाय अधिकारी कामे पूर्ण करणार नाही. शेवटच्या घटकापर्यंत आपण पोहचलो पाहिजे, असे पाटणकर म्हणाले.

कार्यक्रमास मान्यवरांची उपस्थिती -कार्यक्रमास मदत व पूर्नवसन विभागाचे प्रधान सचिव असिम गुप्ता, विभागीय आयुक्त सौरभ राव, प्रभारी जिल्हाधिकारी माधवी सरदेशमुख, मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक मनोज लोहीया, पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल, जलसंपदा विभागाचे मुख्य अभियंता ह. वि. गुणाले, सातारा सिंचन मंडळाचे अधीक्षक अभियंता संजय डोईफोडे, श्रमिक मुक्ती दलाचे अध्यक्ष डॉ. भारत पाटणकर, सत्यजितसिंह पाटणकर उपस्थित होते.

ABOUT THE AUTHOR

...view details