सातारा-सगळीकडे लॉकडाऊन असताना, रस्त्यांवर नाकाबंदी असताना, जिल्हाबंदी असताना सर्वांची नजर चुकवून आज माण तालुक्यात पोहोचलेल्या ३० व्यक्ती व कुटुंबियांविरोधात दहिवडी पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले.
परजिल्ह्यातून आलेल्या ३० जणांविरोधात दहिवडी पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल
महाराष्ट्रात विशेषतः मुंबई पुणे येथे कोरोना विषाणूने हाहाकार माजवलेला आहे. सातारा जिल्ह्यामध्ये आढळलेले बहुतांशी कोरोनाबाधित हे मुंबईहून आल्याचे निष्पन्न झाले आहे.
महाराष्ट्रात विशेषतः मुंबई पुणे येथे कोरोना विषाणूने हाहाकार माजवलेला आहे. सातारा जिल्ह्यामध्ये आढळलेले बहुतांशी कोरोनाबाधित हे मुंबईहून आल्याचे निष्पन्न झाले आहे. त्या पार्श्वभूमीवर पोलीस विभागाने जागोजागी नाकाबंदी तसेच टेहाळणी पथके नेमलेली आहेत. मात्र, अजूनही काहीजण लपून पुणे-मुंबई या ठिकाणाहून गावात येण्याचा प्रयत्न करत आहेत. अशाच व्यक्ती व त्यांचे कुटुंबीय अशा तीस जणांविरोधात दहिवडी पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले. याठिकाणी भादंवि कलम २६९, १८८ सह आपत्ती व्यवस्थापन कायदा कलम ५१ ब व साथरोग नियंत्रण कायदा कलमा अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत.
सातारा जिल्हाधिकारी शेखर सिंग तसेच सातारा पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते हे वारंवार नागरिकांना आहे तिथेच राहण्याचे आवाहन करत असताना अजूनही काही नागरिक मुंबई पुण्यावरून गावाला येऊन स्वतःच्या कुटुंबियांसह गावकऱ्यांचे आरोग्य संकटात टाकत आहेत. अशा व्यक्ती विरोधात कठोरात कठोर कायदेशीर कारवाई करुन त्यांना विलगीकरण कक्षात ठेवले जाणार आहे. आरोग्य विभाग, पोलीस पाटील, गाव स्तरावरील आपत्ती व्यवस्थापन समिती तसेच पोलीस विभाग बाहेरून आलेल्या व्यक्तींवर बारकाईने नजर ठेवून आहे."बाहेर जिल्ह्यातून मूळ गावी येण्याचा कोणीही प्रयत्न करु नये. तसेच कुटुंबीयांनी त्यांना बोलावू नये. असे कोणी आढळल्यास त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाणार असून गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत."अशा सूचना राजकुमार भुजबळ, प्रभारी दहिवडी पोलिस ठाणे यांनी दिल्या आहेत.