सातारा - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रात्री दहा नंतर संचारबंदी लागू केल्याने थंड हवेचे ठिकाण असलेले महाबळेश्वर व पाचगणी शहर गुरुवारी ३१ डिसेंबरच्या रात्री शांत होते. त्यामुळे पूर्वसध्येला दाखल झालेल्या पर्यटकांनी मावळत्या वर्षाचे सेलिब्रेशन व नववर्षाचे स्वागत हाॅटेलमध्ये राहूनच केल्याचे चित्र पाहायला मिळाले. यावेळी कर्फ्यूची अंमलबजावणी करण्यासाठी दोन्ही शहरात पोलिसांनी कडक बंदोबस्त ठेवला होता.
नव वर्षाच्या पूर्वसंध्येनंतर महाबळेश्वर सामसूम; पर्यटकांकडून हॉटेलमधूनच २०२१ चे स्वागत - नव वर्षाच्या पूर्व संध्येला शांतता
कर्फ्यूच्या अनुषंगाने पोलिसांनी पर्यटनस्थळावरील हॉटेल्स, ढाबे रात्री 11 नंतर बंद केले. त्यामुळे नेहमी रात्रीच्यावेळीही गजबजलेल्या दिसणाऱ्या महाबळेश्वरच्या बाजारपेठा सामसूम पाहायला मिळाल्या
१० वाजताच बाजारपेठेत शूकशूकाट-
कर्फ्यूच्या अनुषंगाने पोलिसांनी पर्यटनस्थळावरील हॉटेल्स, ढाबे रात्री 11 नंतर बंद केले. त्यामुळे नेहमी रात्रीच्यावेळीही गजबजलेल्या दिसणाऱ्या महाबळेश्वरच्या बाजारपेठा सामसूम पाहायला मिळाल्या. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नववर्षाचे स्वागत घरात राहून करा, असे आवाहन प्रशासनाने केले होते. या अनुषंगाने पोलिसांनी हॉटेल्स रात्री 11 वाजता बंद करण्याच्या सूचना केल्या होत्या. तथापि, व्यापाऱ्यांसह हाॅटेलचालकांनी १० वाजताच शटर अोढून घेतली. महाबळेश्वर मधील मुख्य बाजार पेठ असलेला डाॅ. साबणे रोड पूर्णता सामसूम होता.
प्रमुख चौकात नाकाबंदी-
महाबळेश्वरमधील चौकांसह शहरात येणार्या आणि बाहेर जाणार्या मार्गांवर नाकाबंदीही केली होती. त्यामुळे तरुणांच्या हुल्लडबाजीला चांगलाच चाप बसला. नाकाबंदी दरम्यान, पोलिसांनी मोटर वाहन कायद्यान्वये अनेक वाहनधारकांवर दंडात्मक कारवाई केली. महाबळेश्वरचे पोलीस निरीक्षक बी. ए. कोंडूभैरी शहरात गस्तीवर होते. रात्री दोन पर्यंत पोलिसांना बंदोबस्तावर तैनात करण्यात आले होते. तुरळक ठिकाणी १२ वाजता पर्यटकांनी शोभिवंत फटाके फोडून नववर्षाचे स्वागत केले.