सातारा : हॉटेल व्यवसायिकाला १० लाख रुपयाच्या खंडणीची मागणी करून दरोडा टाकल्या प्रकरणी अटक केलेल्या आरोपींवर सोमवारी वाई न्यायालयाच्या आवारात देशी कट्ट्यातून गोळीबार करण्यात आला. सुदैवाने या हल्ल्यातून आरोपी बचावले आहेत. दरम्यान, फिर्यादीनेच गोळीबार केल्याचे उघड झाल्याने पोलिसांनी फिर्यादी चंद्रकांत नवघणे यास ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी वाई पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्याची कारवाई सुरू आहे.
आरोपींवर गोळीबार करण्यात आला :वाई-मेनवली येथील हॉटेल मालकास खंडणी मागितल्या प्रकरणी अटकेत असलेल्या कुख्यात गुंड अनिकेत उर्फ बंटी नारायण जाधव, (रा. भुईंज) आणि निखिल तसेच अभिजीत शिवाजी मोरे (रा. गंगापुरी, वाई) यांच्या दिशेने गोळीबार करण्यात आला आहे. यावेळी दोन फायर करण्यात आले. मात्र, कोणीही जखमी झालेले नाही. गोळीबाराच्या घटनेने वाई न्यायालयाच्या परिसरात एकच खळबळ आणि लोकांची पांगापांग झाली. पूर्ववैमनस्यातून हा हल्ला झाल्याची माहिती समोर येत आहे. वाई पोलीस न्यायालय परिसरात दाखल झाले आहेत.
गोळीबाराच्या घटनेने न्यायालयात खळबळ: मेणवली (ता. वाई) येथील हॉटेल मालकास खंडणी मागितल्या प्रकरणी अटक केलेल्या कुख्यात गुंड अनिकेत उर्फ बंटी नारायण जाधव, (रा. भुईंज) आणि निखिल तसेच अभिजीत शिवाजी मोरे (रा. गंगापुरी, वाई) यांना न्यायालयाने दोन दिवस पोलीस कोठडी दिली होती. कोठडीची मुदत संपल्याने आज पुन्हा न्यायालयात हजर करण्यासाठी आणल्यानंतर त्यांच्या दिशेने दोन राऊंड फायर करण्यात आले. सुदैवाने या हल्ल्यातून ते बचावले. गोळीबाराच्या घटनेने न्यायालयात खळबळ उडाली.