सातारा: फलटणमध्ये भरवस्तीतील बंद पॉश बंगला फोडून चोरट्यांनी 20 तोळे दागिन्यांसह 25 हजारांची रोकड लंपास केली आहे. या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली आहे. घटनास्थळी श्वान पथक, ठसे तज्ज्ञांना पाचारण करण्यात आले होते. मात्र, श्वान परिसरातच घुटमळले. दरम्यान, बंद घरावर पाळत ठेऊन चोरट्यांनी हा डाव साधल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.
कडी-कोयंडा तोडून घरात घुसले:फलटण शहरातील कॉलेज रोडवर असलेल्या शुक्रवार पेठेतील अनघा या बंगल्यात ही धाडसी घरफोडी झाली आहे. घर मालक दिलीप फणसे हे मंगळवारी कुटुंबीयांसह बाहेरगावी गेले होते. त्यामुळे बंगल्यात कोणीही नव्हते. बंद बंगला हेरून चोरट्यांनी मुख्य दरवाजाचा कडी-कोयंडा तोडून बंगल्यात प्रवेश केला. बंगल्यातील तिजोरी, कपाटे फोडून दागिने आणि रोकड लंपास केली. चोरी करताना तिजोरी आणि कपाटातील संपूर्ण साहित्य अस्ताव्यस्त फेकले होते.
फ्रिजमधील खाद्य पदार्थांवर ताव:बंगल्यात चोरी झाल्याची खबर फणसे कुटुंबीयांना शेजाऱ्यांनी शनिवारी रात्री दिल्यानंतर परगावी गेलेले फणसे कुटुंब रात्रीच फलटणमध्ये दाखल झाले. चोरट्यांनी तिजोरी आणि कपाटामध्ये ठेवलेले 20 तोळे सोन्याचे दागिने आणि 25 हजार रुपयांची रोकड चोरीला गेल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. तसेच चोरट्यांनी फ्रीज उघडून आतील खाद्यपदार्थांवर ताव मारल्याचे दिसून आले. चोरी करताना चोरट्यांनी कपाटातील सर्व साहित्य खोलीत अस्ताव्यस्त फेकून दिले होते.