सातारा - राज्यासह जिल्ह्यात दुसऱ्या लाटेत कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. अशा स्थितीत जिल्हा क्रीडा संकुलातील बॅडमिंटन हॉलमध्ये सातारा जिल्हा कोविड रुग्णालय सुरू करण्यात आले आहे. या रुग्णालयात 78 ऑक्सिजन बेड असून कोरोना रुग्णांवर उपचार होणार आहेत.
जिल्हा क्रीडा संकुलात नव्याने सुरु करण्यात आलेल्या जिल्हा कोविड रुग्णालयाचे उद्घाटन पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या हस्ते झाले. कोरोना रुग्णांना अधिकच्या सुविधा देण्याचा प्रयत्न असल्याचे पालकमंत्री पाटील यांनी सांगितले. ते पुढे म्हणाले, की राज्य सरकारने कडक निर्बंध घातलेले आहेत. तरीही काही नागरिक विनाकारण रस्त्यावर फिरत आहेत. त्याचा परिणाम रुग्णवाढीवर होत आहे. तरी नागरिकांनी सरकारने घातलेल्या निर्बंधांचे पालन करावे. ज्या कुटुंबातील व्यक्ती कोरोनाबाधित आहेत, अशा कुटुंबातील व्यक्तींनी घराबाहेर पडू नये. तसेच नागरिकांनी मास्कचा वापर, वेळोवळी हाताची स्वच्छता, सुरक्षित अंतर व विनाकरण घराबाहेर पडू नये. या कोरोनाच्या लढाईत सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहनही पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी यावेळी केले.