कराड (सातारा) - विदर्भ, मराठवाडा, खान्देशसह संपूर्ण राज्यात येत्या २० एप्रिलपासून कापूस खरेदी सुरू करण्यात येणार असल्याची माहिती सहकार आणि पणनमंत्री बाळासाहेब पाटील यांनी दिली. ते कराड येथे पत्रकार परिषदेत बोलत होते. लॉकडाऊनमधील सूचनांचे पालन करून कापूस खरेदी करावी, अशा सूचना जिल्हाधिकाऱ्यांना केल्या असल्याचेही पाटील म्हणाले.
सध्या सर्वत्र लॉकडाऊन आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचा कापूस त्यांच्या घरातच आहे. तो खरेदी करणे आवश्यक आहे. विदर्भ, मराठवाड्यासह महाराष्ट्रातील दुष्काळी तालुक्यात कापसाचे पीक घेतले जाते. हा कापूस खरेदी करण्याचा निर्णय शासनाने घेतला असल्याचे पाटील यांनी सांगितले. लॉकडाऊनमधील सूचनांचे पालन करून कापूस खरेदीचे व्यवहार करण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांना दिल्या असल्याचेही पाटील म्हणाले.