कराड - लसीकरणासाठी सकाळी सातपासून रांगेत उभे राहणार्यांना डावलून वशिलेबाजांना अगोदर लस दिली जात असल्याचा प्रकार कराडच्या टाऊनमधील लसीकरण केंद्रावर उघडकीस आला आहे. ओळखीच्या लोकांना एका राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून कूपन दिले जात होते. त्याद्वारे त्यांना लसीकरणात प्राधान्य दिले जात असल्याचे चित्र पहायला मिळाले. त्यामुळे नागरिकांनी गोंधळ सुरू केला. तसेच युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष शिवराज मोरे यांनी लसीकरण केंद्रावर येऊन वशिलेबाजीच्या प्रकाराबद्दल जिल्हाधिकार्यांकडे तक्रार केली.
लसीकरण केंद्रावर वशिलेबाजी
कराड येथे उपजिल्हा रूग्णालय तसेच टाऊन हॉलमध्ये लसीकरण केंद्र आहे. टाऊन हॉल येथील केंद्रावर लसीकरणासाठी नागरिकांनी सोमवारी सकाळी सातपासून रांगा लावल्या होत्या. परंतु, काही ओळखीच्या लोकांना एका राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून गुपचूप कुपन दिले जात होते. तसेच तातडीने त्यांना लसही दिली जात होती. सकाळपासून रांगेत उभे राहिलेल्या नागरिकांच्या ही बाब लक्षात येताच त्यांनी गोंधळ सुरू केला. त्या ठिकाणी कराड शहर काँग्रेसचे उपाध्यक्ष जितेंद्र ओसवाल हेही लस घेण्यासाठी रांगेत उभे होते. लसीकरणातील वशिलेबाजीची माहिती त्यांनी युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष शिवराज मोरे यांना दिली. ते तातडीने लसीकरण केंद्रावर दाखल झाले. टाऊन हॉलमधील केंद्राच्या परिसरात एका राजकीय पक्षाचे कार्यकर्ते ओळखीच्या लोकांचे कुपन देऊन लसीकरण करून घेत असल्याचे शिवराज मोरे यांनी पाहिले. त्यामुळे त्यांनी या प्रकाराची तक्रार जिल्हाधिकारी शेखर सिंह यांच्याकडे केली. लसींचा मर्यादीत पुरवठा आणि नागरिकांची मोठ्या प्रमाणात गर्दी, असे चित्र सर्वच केंद्रांवर दिसत आहे. त्यामध्येही वशिलेबाजी सुरू झाली आहे.
हेही वाचा -संजय राऊतांविरोधात गुन्हा दाखल करण्याची धनगर समाजाची मागणी