सातारा - जिह्यातील क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालयातून आज जिल्ह्यातला नववा रुग्ण कोरोनामुक्त होऊन बाहेर पडला. फलटण तालुक्यातील ही तरुणी आहे. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी याबाबतची माहिती दिली. जिल्ह्यात एकाबाजूस कोरोनाग्रस्तांची संख्या वाढत असताना रुग्ण बरे होऊन घरी जाण्याचे प्रमाणही वाढत आहे, ही दिलासा देणारी बाब आहे.
आज मोठ्या उत्साहात डॉक्टर्स, नर्स, आरोग्य कर्मचारी यांनी कोरोनामुक्त झालेल्या तरुणीला शुभेच्छा दिल्या. यानंतर त्या तरुणीने सर्वांचे आभार व्यक्त करून आपलं घर गाठलं. आगामी चौदा दिवस तिला घरीच इतरांपासून अलिप्त ( होम कोरंटाईन ) राहावे लागणार असल्याचे डॉ. गडीकर यांनी सांगितलं. दरम्यान, सातारा जिल्ह्यात याआधी आठ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.
सातारा जिल्ह्यात आतापर्यंत ७४ कोरोनाचे रुग्ण आढळून आहेत. सद्य घडीला ६३ कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर कोरोनामुळे २ जणांचा मृत्यु झाला आहे. पुण्याच्या बी.जे. वैद्यकीय महाविद्यालयात दररोज सातारा जिल्ह्यातून सुमारे १५० ते २०० संशयितांचे स्वॅब तपासणीसाठी पाठवले जात आहेत.