सातारा - क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथे येत्या 7 ते 8 दिवसात अत्याधुनिक कोरोना टेस्टींग लॅब सुरु होईल. यामुळे कोरोना टेस्टींगचे अहवाल लवकरात लवकर मिळून बाधितांवर तत्काळ उपचार करणे शक्य होणार आहे, अशी माहिती पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी दिली. जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात आज कोरोना विषाणुच्या प्रादुर्भावासंदर्भात पालकमंत्री पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक पार पडली. यावेळी ते बोलत होते.
'क्रांतीसिंह नाना पाटील रुग्णालयात येत्या 7 ते 8 दिवसात कोरोना चाचणी होणार'
क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथे येत्या 7 ते 8 दिवसात अत्याधुनिक कोरोना टेस्टींग लॅब सुरु होईल. यामुळे कोरोना टेस्टींगचे अहवाल लवकरात लवकर मिळून बाधितांवर तत्काळ उपचार करणे शक्य होणार आहे, अशी माहिती पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी दिली.
लग्नकार्यामुळे राज्यात प्रादुर्भाव झाल्याचे अनेक प्रकरणे समोर आली आहेत, असे सांगून पालकमंत्री पाटील पुढे म्हणाले, काही लग्न कार्यातून कोरोनाबाधित वाढल्याचे लक्षात आले आहे. लग्न कार्यासाठी रितसर परवानगी घेणे आवश्यक असून, 20 लोकांनाच लग्नात उपस्थित राहण्यासाठी परवानगी द्यावी. कुणी विना परवानगी लग्न कार्य करत असेल तर कायदेशीर कारवाई करावी, असे आदेश पाटील यांनी दिले. महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेचा लाभ राज्यातील सर्व नागरिकांना सर्व अंगीकृत रुग्णालयांमार्फत उपलब्ध करुन देण्याबाबत शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने 23 मे 2020 अन्वये शासन निर्णय जारी केला असल्याचे पाटील म्हणाले.
या बैठकीला गृहराज्यमंत्री (ग्रामीण) शंभूराज देसाई, खासदार श्रीनिवास पाटील, खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर, आमदार छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले, आमदार दिपक चव्हाण, आमदार शशिकांत शिंदे, जिल्हाधिकारी शेखर सिंह, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय भागवत, पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष प्रदिप विधाते, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर, जिल्हा आरोग्य अधिकारी अनिरुद्ध आठल्ये आदी उपस्थित होते.