सातारा -फलटण तालुक्यात चित्रिकरण सुरू असलेल्या 'आई माझी काळूबाई' या मालिकेच्या सेटवरील 27 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. ज्येष्ठ अभिनेत्री आशालता वाबगावकर यांचाही त्यामध्ये समावेश असून त्यांच्यावर सातारा हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. त्यांची प्रकृती चिंताजनक असून त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले आहे.
ज्येष्ठ अभिनेत्री आशालता वाबगावकर व्हेंटिलेटरवर; प्रकृती चिंताजनक - आशालता वाबगावकर कोरोनाबाधित
ज्येष्ठ अभिनेत्री आशालता वाबगावकर यांना कोरोनाची लागण झाली असून त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले आहे. मुंबईहुन आलेल्या एका डान्स ग्रुपमुळे कोरोनाचा प्रसार झाल्याची प्राथमिक शक्यता वर्तवली जात आहे.
सोनी मराठी वाहिनीवर सुरू असलेल्या 'आई माझी काळूबाई' या मालिकेचे चित्रीकरण फलटण तालुक्यातील हिंगणगावात सुरू आहे. या मालिकेच्या शीर्षक गीताचे चित्रीकरण काही दिवसांपूर्वी पार पडले. यावेळी मुंबईहून आलेल्या एका डान्स ग्रुपमुळे कोरोनाचा प्रसार झाल्याची प्राथमिक शक्यता वर्तवली जात आहे. या मालिकेच्या चित्रिकरण सेटवरील 27 जणांना कोरोनाची लागण झाली असून ज्येष्ठ अभिनेत्री आशालता वाबगावकर यांचाही बाधितांमध्ये समावेश आहे. त्यांना उपचारासाठी सातारा हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटरमध्ये दाखल करण्यात आले आहे.
'आई माझी काळूबाई' ही मालिका सोनी मराठीवर नुकतीच प्रसारीत झाली आहे. या मालिकेत अलका कुबल, प्राजक्ता गायकवाड यांच्यासह आशालता वाबगावकर यांची देखील प्रमुख भूमिका आहे.