सातारा - माण तालुक्यातील दहिवडी व किरकसाल येथे कोरोना पाॅझिटिव्ह रुग्ण सापडल्याचे प्रशासनाने जाहीर केले. मात्र, हे रुग्ण शोधताना प्रशासनाची तारांबळ उडाली. तर नरवणे येथून पकडून मुंबईला नेण्यात आलेला आरोपीसुध्दा कोरोना पाॅझिटिव्ह आल्याने चिंतेत भर पडली आहे. त्यातच हा आरोपी दहिवडीत फिरला व थांबला असल्याची माहिती समोर आल्याने दहिवडीकरांची डोकेदुखी वाढली आहे. त्यातच त्याच्या सहवासात आलेले 2 रुग्ण दहिवडीमधील पाॅझिटिव्ह आले आहेत.
सातारा: कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण शोधताना प्रशासनाची तारांबळ - सातारा कोरोना न्यूज
माण तालुक्यातील दहिवडी व किरकसाल येथे कोरोना पाॅझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. तर नरवणे येथून पकडून मुंबईला नेण्यात आलेला आरोपीसुध्दा कोरोना पाॅझिटिव्ह आल्याने चिंतेत भर पडली आहे. त्यातच हा आरोपी दहिवडीत फिरला व थांबला असल्याची माहिती समोर आल्याने दहिवडीकरांची डोकेदुखी वाढली आहे.
१४ जूनला दुपारी चार वाजता एक ६० वर्षीय व्यक्ती खासगी वाहनाने मुंबईहून दहिवडी येथे आपली दोन मुले व एका सुनेसोबत साळुंखे वस्तीवरील आपल्या पाहुण्यांकडे आली. खबरदारीचा उपाय म्हणून शिरवळ येथे त्या वयस्कर व्यक्तीचा स्वॅब तपासणीसाठी घेण्यात आला होता. रात्री पाहुण्यांकडे मुक्काम करुन १५ जूनला सकाळी हे सर्वजण मुंबईला निघून गेले. त्या व्यक्तीचा शिरवळ येथे घेतलेल्या स्वॅबचा रिपोर्ट १५ जूनला रात्री पाॅझिटिव्ह आला. ती व्यक्ती दहिवडी येथील नसल्याने पोलीस यंत्रणा, आरोग्य यंत्रणा, प्रशासकीय यंत्रणा या सर्वांची त्या व्यक्तीला शोधताना तारांबळ उडाली. अखेर संबंधित व्यक्ती कोणाकडे आली होती त्याचा तपास लागला. मात्र, एका रात्रीसाठी भेटायला आला अन त्याच्यामुळे संपर्कात आलेल्या नऊ जणांना क्वारंटाईन व्हावे लागले.
तर दहिवडी शहरातील एक डॉक्टर देखील पाॅझिटिव्ह निघाल्याने त्यांनी तपासणी केलेले 250 ते 300 रुग्ण सध्या स्वतःच्या घरातच क्वारंटाईन आहेत. यामुळे माण तालुक्यात धोका वाढू शकतो. यामध्ये दहिवडीकरांची कसलीही चूक नसताना फक्त फिरत्या मुंबईकरांमुळे दहिवडीकरांची डोकेदुखी वाढली असून, नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे.