सातारा-म्हसवड शहराच्या मध्यवर्ती भागात राहणारा ५८ वर्षीय पुरुष कोरोना पॉझिटिव्ह आढळला आहे.यामुळे शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. शहरात कोरोनाचा शिरकाव झाल्याचे शनिवारी रात्री स्पष्ट झाले. प्रशासनाच्यावतीने या भागात कंटेनमेंट झोन जाहीर करण्यात आला आहे. कंटेंनमेंट झोनमध्ये अत्यावश्यक सेवा वगळता इतर सेवा बंद राहणार आहेत. १४ दिवसांसाठी शहरातील मुख्य भागाचा परिसर लाॅकडाऊन करून सील करण्यात आला आहे.
५८ वर्षीय पुरुष मागील काही दिवसांपूर्वी बारामती तालुक्यातील एका गावात धार्मिक कार्यक्रमाचे निमंत्रण देण्यासाठी गेला होता. त्याच्यासोबत नऊ जणांनी एकत्रित प्रवास केल्याचे समजते. तेथून आल्यावर ५८ वर्षीय पुरुषास त्रास जाणवू लागला त्यानंतर त्याने काही दिवस घरीच उपचार घेतले. मात्र, त्रास वाढू लागल्यावर एका खाजगी रुग्णालयात दाखवल्यानंतर डॉक्टरांच्या सल्ल्याने पुढील उपचार घेण्यासाठी कराडला दाखल करण्यात आले. त्यानंतर त्याचा स्वॅब घेतल्यानंतर शनिवारी रात्री तो कोरोना पॉझिटिव्ह असल्याचा रिपोर्ट आला. यामुळे शहरात खळबळ माजली आहे.