जावळी (सातारा) - तालुक्यातील मेढा ग्रामीण रुग्णालयाच्या समोर व्हेंटिलेटर आणि ऑक्सिजन अभावी एका कोरोनाग्रस्ताचा रिक्षातच मृत्यू झाला. मृत्यूनंतरही तब्बल तीन तास ग्रामीण रुग्णालयाच्या आवारात रिक्षात मृतदेह पडून होता.
रिक्षामध्ये पडलेला मृतदेह परप्रांतीय मजुराचा असल्याची माहिती समोर आली आहे. तो परप्रांतीय मजूर झारखंडचा रहिवासी असल्याची माहिती मिळाली आहे. मागील काही दिवसांपासून त्या व्यक्तीला कोरोनाची लक्षणे जाणवत होती. त्यानंतर त्याला जास्त त्रास होत असल्याने काही सहकाऱ्यांनी त्याला ग्रामीण रुग्णालयात हलविले. मात्र, रुग्णालयात तत्काळ त्याला दाखल करुन घेण्यात आले नाही किंवा व्हेंटीलेटर व ऑक्सीजनचा पुरवठा त्या रुग्णाला देण्यात आला नाही. अखेत ऑक्सीजन वेळेवर न मिळाल्याने त्याचा रिक्षातच मृत्यू झाला.
हा दुर्दैवी प्रकार घडत असताना रुग्णालयातील कोणताच कर्मचारी मदतीला धावला नाही. त्या रुग्णाच्या मृत्यूनंतरही तब्बल तीन तास त्यांना ताटकळत बसावे लागले. मृतदेह रुग्णालयात नेण्यासाठी रुग्णालयाचा एकही कर्मचाी धावला नाही. शेवटी तो मृतदेह ज्यांनी त्याला रिक्षातून आणले होते, त्यांनी रुग्णालयात नेले. त्यानंतर एका तासानंतर त्या मृत रुग्णाचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला.