सातारा- कोरोनाने जिल्ह्यात उग्र रुप धारण करत जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यात अस्तित्व दाखवले आहे. दुसरीकडे मुंबई व दिल्ली सारख्या कार्पोरेट शहरात कोरोनाचा वेग मंदावला असला तरी सातारा जिल्ह्यात रात्रीच्या अहवालात दररोज बाधितांची संख्या वाढतच आहे.जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या 5 हजारांच्या उंबरठ्यावर पोहोचली आहे. जिल्ह्यात तपासणींचा वेग वाढवल्यानंतर आता लक्षणे नसलेल्या किंवा सौम्य लक्षणे असलेल्या कोरोना बाधितांना घरीच राहून उपचार घेण्यासाठी जिल्हा प्रशासनाने होम आयसोलेशनचा पर्याय पुढे आणला आहे. त्यासंदर्भात मार्गदर्शक सूचनांची पुस्तिका जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी प्रसिध्द केली आहे.
जिल्ह्यात होम आयसोलेशन सुरू होणार
जिल्ह्यात कोरोनाची स्थिती गंभीर होत असल्याचे दिसत असले तरी दुसरीकडे कोरोनामुक्तीचे प्रमाणही चांगले आहे. कोरोनाच्या लक्षणांबाबतचा गोंधळही आता प्रशासनाने घेतलेल्या होम आयसोलेशनच्या निर्णयामुळे दूर होणार असून त्यासाठी जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी याबाबतची मार्गदर्शिका प्रसिध्द केली आहे. कोणतेही लक्षण नाही व ज्यांना सौम्य लक्षणे आहेत अशा कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांना घाबरुन न जाता घरात राहूनच आरोग्य विभागाच्या साथीने कोरोनावर मात करता येणार आहे.
सर्वांनीच नियम पाळण्याची गरज
एकीकडे कोरोनाचा कहर वाढत असताना त्यात कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्या जास्त असल्याने दिलासा मिळत आहे. मात्र, संसर्ग होवूच नये व नवीन बाधित रुग्ण आढळू नयेत यासाठी सर्वांनीच नियम पाळून कोरोना विरुध्दच्या लढ्यात योगदान देण्याची गरज आहे. आता मार्केट सकाळी 9 ते सायंकाळी 7 यावेळेत सुरु केले असून जिल्ह्यातील बाजारपेठांमध्ये अद्यापही व्यापाऱ्यांसह नागरिकांनी शिस्तपालन करणे आवश्यक आहे.