सातारा - महात्मा फुले कर्जमाफी योजनेच्या प्रक्रियेत सहकार विभागाचे अधिकारी व्यस्त आहेत. त्यामुळे राज्यातील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका आणि विकास सेवा सोसायटींच्या निवडणुका तीन महिने पुढे ढकलण्यात आल्या आहेत, अशी माहिती सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांनी दिली. त्यांनी कराडमध्ये पत्रकारांशी संवाद साधला.
जिल्हा बँक-सोसायटीच्या निवडणुका तीन महिने लांबणीवर; सहकार मंत्र्यांची माहिती - सहकार मंत्री बाळासाहेब पाटील
कर्जमाफी योजनेच्या प्रक्रियेत सहकार विभागाचे अधिकारी व्यस्त आहेत. त्यामुळे राज्यातील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका आणि विकास सेवा सोसायटींच्या निवडणुका तीन महिने पुढे ढकलण्यात आल्या आहेत, अशी माहिती सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांनी दिली.
राज्यभरात अनेक ठिकाणी जिल्हा मध्यवर्ती बँकांच्या निवडणुकीची प्रक्रिया सुरू आहे. तसेच काही ठिकाणी ती अंतिम टप्प्यात आहे. परंतु, कर्जमाफी योजनेचे काम पूर्ण करण्याची जबाबदारी सहकार विभागाच्या अधिकाऱ्यांवर आहे. सहकार विभागाची यंत्रणा या कामात गुंतलेली असल्याने बँका आणि सोसायट्यांच्या निवडणुका पुढे ढकलण्याची मागणी होत होती. यामुळे संबंधित निर्णय घेण्यात आला असल्याचे मंत्री महोदयांनी सांगितले. लिंकिंगच्या साहाय्याने 1 फेब्रुवारीपासून कर्जमाफीची प्रक्रिया सुरू होणार असल्याची माहिती पाटील यांनी दिली आहे.
महात्मा फुलेंच्या नावाने जाहीर केलेल्या योजनेच्या माध्यमातून दोन लाखापर्यंतचे अल्प मुदतीचे कर्ज असणार्यांना कर्जमाफीचा लाभ देण्याचा शासनाचा मनोदय असल्याचे त्यांनी सांगितले. लवकरच शेतकर्यांच्या खात्यावर कर्जमाफीचे पैसे जमा होणार असल्याचे आश्वासन सहकार मंत्र्यांनी दिले आहे. तसेच नियमित कर्जफेड करणाऱ्यांसाठी शासनाने मंत्रिमंडळाची उपसमिती स्थापन केली आहे, असे ते म्हणाले. या समितीच्या माध्यमातून नियमित कर्जफेड करणार्यांना न्याय देण्याचा आमचा प्रयत्न असल्याचे सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांनी सांगितले.