सातारा- सहकार आणि पणन मंत्रिपद मिळालेल्या कराड उत्तरचे आमदार बाळासाहेब पाटील यांची रविवारी (दि. 5 जाने.) कराडमध्ये जल्लोषात मिरवणूक काढण्यात आली. दिवंगत यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीसह कराडमधील महापुरूषांच्या पुतळ्यांना बाळासाहेब पाटील यांनी अभिवादन केले. रॅलीवेळी कराडकरांनी पुष्पवृष्टी करून मंत्री पाटील यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव केला. कार्यकर्त्यांनी त्यांची पेढ्यांची तुला केली. त्यानंतर नागरीकांना पेढे वाटण्यात आले.
विलासकाका उंडाळकर यांच्यानंतर बाळासाहेब पाटील यांच्या रूपाने कराड तालुक्याला दुसऱ्यांदा सहकार आणि पणन खात्याचे मंत्रिपद मिळाले आहे. बाळासाहेबांना सहकार मंत्रिपद जाहीर झाल्यानंतर त्यांना शुभेच्छा देण्यासाठी रविवारी सकाळपासून त्यांच्या निवासस्थानी कार्यकर्त्यांची रिघ लागली होती. दुपारी बाळासाहेब पाटील यांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराजांसह शहरातील महापुरूषांच्या पुतळ्यांना अभिवादन केले. दत्त चौकात कार्यकर्त्यांनी त्यांची पेढे तुला केली.
हलगी आणि घुमक्याच्या कडकडाटात दत्त चौकातून मिरवणुकीस प्रारंभ झाला. रॅलीतील जीपमध्ये मंत्री बाळासाहेब पाटील, खासदार श्रीनिवास पाटील, राष्ट्रवादीच्या माहिती तंत्रज्ञान सेलचे प्रदेशाध्यक्ष सारंग पाटील, जिल्हा परिषद सदस्य मानसिंगराव जगदाळे, इंद्रजीत चव्हाण, नगरसेवक सौरभ पाटील, कराड पंचायत समितीचे सभापती प्रणव ताटे, संभाजी सुर्वे, जशराज पाटील होते. दत्त चौकातून मिरवणूक सुरू झाली. कराडच्या मुख्य बाजारपेठेतून मिरवणूक प्रीतिसंगमाकडे गेली. यावेळी व्यापारी, सार्वजनिक गणेश मंडळे, विविध संस्थांच्या पदाधिकार्यांनी मंत्री पाटील यांचे स्वागत केले. चौकांमध्ये रॅलीवर पुष्पवृष्टी करण्यात आली. मिरवणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.