कराड (सातारा) - काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी मंत्री विलासकाका उंडाळकर यांचे सुपूत्र आणि जिल्हा परिषद सदस्य अॅड. उदयसिंह पाटील यांना प्रदेश काँग्रेसमध्ये महत्त्वाच्या पदाची जबाबदारी दिली जाणार आहे. यासंदर्भात शुक्रवारी पृथ्वीराज चव्हाण, विलासकाका उंडाळकर यांच्या उपस्थितीत कराडमध्ये संयुक्त पत्रकार परिषद घेऊन प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात घोषणा करणार आहेत. काँग्रेसचे प्रभारी एस. के. पाटील हे सुध्दा यावेळी उपस्थित राहणार आहेत.
एकाच पक्षात असतानाही चव्हाण-उंडाळकर यांच्यात कित्येक वर्षे राजकीय सख्य नव्हते. त्याचा बराच फटका सातार्यात काँग्रेसला बसला. ज्येष्ठ नेते विलासकाका उंडाळकर हे 1980 पासून 2014 पर्यंत सलग 35 वर्षे कराड दक्षिणचे आमदार होते. या काळात त्यांनी सहकार, विधी व न्याय, पशुसंवर्धन-दुग्ध विकास, मदत, पुनर्वसन या खात्यांचे मंत्रीपदही भूषविले. 1999 ला राष्ट्रवादीची स्थापना झाल्यानंतर राष्ट्रवादीने सातारा जिल्ह्यावर वर्चस्व मिळविले. मात्र, कराड दक्षिण विलासकाकांनी अभेद्य ठेवला. आजपर्यंत या मतदारसंघात अन्य पक्षाला शिरकाव करता आलेला नाही.
अन् चव्हाण-उंडाळकर गटात समेटाचे वारे वाहू लागले
आदर्श घोटाळ्यात 2010 मध्ये अशोक चव्हाण यांना मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागल्यानंतर पृथ्वीराज चव्हाण यांची मुख्यमंत्रीपदी वर्णी लागली. त्यानंतर 2014 च्या निवडणुकीत विलासकाकांना डावलून पृथ्वीराज चव्हाण यांना काँग्रेसने कराड दक्षिणची उमेदवारी दिली. त्यामुळे विलासकाकांनी ती निवडणूक अपक्ष लढविली. त्यात त्यांचा पराभव झाला. त्यानंतर 2019 च्या निवडणुकीत पृथ्वीराज चव्हाण, भाजपचे डॉ. अतुल भोसले आणि अपक्ष अॅड. उदयसिंह पाटील अशी पुन्हा तिरंगी लढत झाली. यावेळी अॅड. पाटील यांच्या उमेदवारीमुळे काँग्रेसमधील मतांचे ध्रुवीकरण टळले आणि पृथ्वीराज चव्हाण यांचा विजय सूकर झाला. निकालानंतर अॅड. उदयसिंह पाटील यांनी पृथ्वीराज चव्हाण यांच्या निवासस्थानी जाऊन सत्कार केला. तेव्हापासून चव्हाण-उंडाळकर गटात समेटाचे वारे वाहू लागले होते.