सातारा स्वातंत्र्याच्या अमृत महोत्वानिमित्त माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसने कराड शहरातून भव्य तिरंगा पदयात्रा काढून, तर माजी सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीने सायंकाळी मशाल रॅली काढून स्वातंत्र्य लढ्यातील स्वातंत्र्य सैनिकांच्या त्यागाचे स्मरण केले. तिरंगी झेंडे, शंभर फुटी तिरंगा ध्वज, ढोल-ताशे आणि स्वातंत्र्य लढ्यातील क्रांतिकारकांच्या चित्ररथांमुळे कराड शहर तिरंगामय झाले होते.
काँग्रेसच्या पदयात्रेने कराड बनले तिरंगामयभेदा चौकातून तिरंगा पदयात्रेला सुरूवात झाली. तहसीलदार कचेरी, शाहू चौकातून पदयात्रा दत्त चौकात आली. त्याठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास अभिवादन करून माजी मुख्यमंत्री तथा कराड दक्षिणचे आमदार पृथ्वीराज चव्हाण हे पदयात्रेत सहभागी झाले. यावेळी दत्त चौक गर्दीने फुलून गेला होता. स्वातंत्र्याचा जयघोष करत पदयात्रा मुख्य बाजारपेठ मार्गाने पुढे गेली. रस्त्याच्या दुतर्फा नागरीकांची गर्दी होती. आझाद चौकातील मंडपात भोईराज समाज मंडळाने स्वातंत्र्य सैनिकांच्या प्रतिमांची गॅलरी उभारली होती. त्याठिकाणी पृथ्वीराज चव्हाण, अॅड. उदयसिंह पाटील-उंडाळकर यांनी अभिवादन केले. पदयात्रेमुळे संपुर्ण कराड तिरंगामय झाले होते.
क्रांतिकारकांमुळेच स्वातंत्र्याची पहाटआझाद चौकातून तिरंगा पदयात्रा चावडी चौकमार्गे कन्या शाळा आणि तेथून नगरपालिका चौकाकडे आली. त्याठिकाणी पदयात्रेचे सभेत रूपांतर झाले. 1857 च्या उठावापासून ते 1947 पर्यंतच्या लढ्यात योगदान देणार्या क्रांतिवीरांच्या योगदानाचा पृथ्वीराज चव्हाण यांनी गौरव केला. स्वातंत्र्य संग्रामातील क्रांतिकारकांच्या त्यागाचे स्मरण करून पुर्वजांचा ज्वाजल्य इतिहास आजच्या पिढीसमोर आला पाहिजे. त्यांच्या योगदानातूनच स्वातंत्र्याची पहाट उगवली आहे. हे कदापि विसरता येणार नाही, असे पृथ्वीराज चव्हाण यांनी पदयात्रेला संबोधित करताना सांगितले.