महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

भाजप आमदार जयकुमार गोरेंवर शिवीगाळ व दमदाटी तर शिवसेना नेते शेखर गोरेंवर अपहरणाचा गुन्हा दाखल - district bank election satara

शिवसेना नेते शेखर गोरे यांच्यावर अपहरणाचा तर भाजप आमदार जयकुमार गोरेंवर शिवीगाळ व दमदाटी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, जिल्हा बँकेची निवडणुकीसाठी ठराव प्रक्रिया शांततेत सुरू असताना माण तालुक्यात मात्र गुन्हे दाखल झाल्याने निवडणूक वादाच्या भोवर्‍यात सापडली आहे.

satara
भाजप आमदार जयकुमार गोरे

By

Published : Jan 27, 2020, 11:46 PM IST

सातारा- जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी सोसायट्यांचे ठराव सुरू आहेत. माण तालुक्यात मात्र, या ठरावावरून चेअरमन, व्हा. चेअरमन यांना जबरदस्तीने गाडीत बसवून नेणे, घरात घुसून जीवे मारण्याची धमकी देण्याचे प्रकार घडले. सोसायटीच्या चेअरमन, व्हा. चेअरमन, सचिवांना जबरदस्तीने गाडीत घालून नेताना विरोध करणाऱ्या महिला संचालिकेस धक्काबुक्की केल्याप्रकरणी शेखर गोरे यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. दुसरीकडे शेखर गोरे यांच्या कार्यकर्त्याच्या घरी जावून त्यांच्या आईजवळ ‘मुलास कुठे मारून टाकीन कळणार न्हाय,’ अशी धमकी दिल्याप्रकरणी आ. जयकुमार गोरेंवर देखील गुन्हा दाखल झाला आहे.

माहिती देताना 'ईटीव्ही भारत' प्रतिनिधी

कुळकजाई सोसायटीचे ठराव घ्यायची प्रक्रिया सुरू आहे. यावेळी ठराव घेताना दबाव आणून धक्काबुक्की झाल्याची तक्रार सुनंदा कृष्णराव शेगडे यांनी दहिवडी पोलीस ठाण्यात दिली आहे. त्यांनी तक्रारीत म्हटले आहे की, त्या कुळकजाई, ता. माण येथील सहकारी सोसायाटीत संचालक म्हणून २०१६ पासून कार्यरत आहेत. गेल्या आठ दिवसांपूर्वी सोसायटीचे सचिव संतोष इनामदार यांनी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने आज कुळकजाई सोसायटीच्या कार्यालयात सकाळी दहा वाजता ठराव प्रक्रिया पार पडणार असल्याबाबत नोटीस दिली होती.

त्यानुसार दि. २७ रोजी आनंदराव शिवराम पवार, सदाशिव बयाजी सूर्यवंशी, शामराव पांडुरंग पवार, यमुना बबत घाडगे, रविंद्र नामदेव पांडेकर, रामचंद्र बाबुराव माने, जयवंत जगन्नाथ शिंदे, सत्यवान कदम आदी संचालक सकाळी ९.५५ वाजता सोसायटीच्या कार्यालयात गेले. त्याअगोदरच कुमार गोविंदराव पोतेकर, सतीश आबाजी घाडगे, विठ्ठल आप्पाजी पवार सचिव संतोष इनामदार व शिपाई पारसे असे उपस्थित होते. सकाळी दहाच्या सुमारास प्रोसिडींगवर हजर असलेल्या १३ पैकी १२ सदस्यांच्या सह्या घेण्यात आल्या. त्यानंतर सचिव संतोष इनामदार यांनी उपस्थित सर्व संचालकांना नमूदचा ठराव हा कोणाच्या नावाने घ्यायचा, असे विचारले. यावेळी सुनंदा शेडगे यांचे पती कृष्णराव गंगाराम शेडगे यांच्या नावाला १२ संचालकांनी मान्यता दिली.

त्यानंतर बाहेर उभे असलेले कृष्णराव कार्यालयात जात असतानाच त्याठिकाणी पाठीमागून शेखर भगवानराव गोरे (रा. बोराटवाडी), सुनील जाधव (रा. कासारवाडी), बशीर मुलाणी (रा. कुळकजाई), अमोल कुलकर्णी (रा. कुळकजाई), राजा जाधव (रा. पिंगळी खुर्द), आप्पा बुधावले (रा. कुळकजाई) व इतर २० ते २५ जणांनी अचानक आत येवून सोसायटीचे सचिव संतोष इनामदार, चेअरमन जयवंत जगन्नाथ शिंदे, व्हा. चेअरमन शामराव पांडुरंग पवार यांना ठरावाची प्रक्रिया थांबवा व माझ्या बरोबर येवून मी सांगेल त्याप्रमाणे ठराव करा, असे म्हणून त्या तिघांना दमदाटी करून त्यांच्या गाडीत बसवत होते. यावेळी फिर्यादी सुनंदा शेडगे यांनी गाडीजवळ जावून शेखर गोरे यांना आमची माणसे कुठे सोडायची नाहीत, अन्यथा मी येथेच टकरा घेईन, असे सांगितले. मात्र, शेखर गोरे यांनी धक्काबुक्की करून बाजूला सारले व लोकांना त्यांच्या गाडीत घेवून गेले, असेही सुनंदा शेडगे यांनी तक्रारीत म्हटले आहे.

दरम्यान, याबाबत सौ. सुरेखा आप्पासो बुधावले यांनीही तक्रार दिली आहे. यामध्ये म्हटले आहे की, त्यांचे पती आप्पासो रघुनाथ बुधावले कुळकजाई येथील पवनचक्की सबस्टेशन येथे नोकरीस असून ते शेखर गोरे यांचे कार्यकर्ते आहेत. २६ जानेवारीला आप्पासो बुधावले हे सबस्टेशनवर रात्रीपाळी ड्युटीसाठी गेले होते. घरात फिर्यादी, दोन मुले, सासू-सासरे होते. त्याचरात्री १ वाजता घराच्या दरवाजा ठोठावण्याचा आवाज आला. दरवाजा उघडला असता आ. जयकुमार गोरे (रा. बोराटवाडी) तसेच कुळकजाई येथील किसन गंगाराम शेडगे, आनंदराव पवार, सत्यवान कदम व अन्य तिघेजण दारात उभे होते. ते सर्व घरात घुसले. आ. गोरे यांनी ‘आप्पा कोठे आहे?’ अशी विचारणा केली. दरम्यान, आवाजामुळे सासू-सासरे उठले. काय झाले असे विचारले असता आ. जयकुमार गोरे यांनी आप्पाला समजावून सांगा. तो माझ्या विरोधात गेला तर सुट्टी देणार नाही. कुठे मारून टाकीन, हे कळणारही नाही, अशी धमकी देवून सर्वजण निघून गेले, असे तक्रारीत म्हटले आहे.

सदर कृत्या केल्या प्रकरणी शिवसेना नेते शेखर गोरे यांच्यावर अपहरणाचा तर भाजप आमदार जयकुमार गोरेंवर शिवीगाळ व दमदाटी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, जिल्हा बँकेची निवडणुकीसाठी ठराव प्रक्रिया शांततेत सुरू असताना माण तालुक्यात मात्र गुन्हे दाखल झाल्याने निवडणूक वादाच्या भोवर्‍यात सापडली आहे.

हेही वाचा-सोना अलॉईज मारहाण व खंडणी प्रकरण; छ. उदयनराजेंसह ११ जणांची निर्दोष मुक्तता

ABOUT THE AUTHOR

...view details