सातारा- एका खासगी वृत्त वाहिनीवरील कार्यक्रमात वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी छत्रपती शिवरायांचे वंशज खासदार उदयनराजे भोसले यांच्याबद्दल अवमानकारक वक्तव्य केल्याचा आरोप आहे. याप्रकरणी प्रकाश आंबेडकर यांच्यावर सातारा शहर पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल झाला आहे.
भागवत शिवाजी निकम (रा. वाढे, सातारा) यांच्या फिर्यादीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एका खासगी वृत्त वाहिनीवरील मुलाखतीदरम्यान प्रकाश आंबेडकर यांनी खासदार उदयनराजे भोसले यांच्याविषयी अत्यंत खालच्या पातळीवर येऊन वक्तव्य केले. त्यामुळे, त्यांची बदनामी झाली आहे, अशी फिर्याद करण्यात आली आहे. प्रकाश आंबेडकर यांच्यावर भा.दं.विच्या कलम ५०० अन्वये अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
छत्रपतींवर केली होत टीका....
मराठा आरक्षणाबाबत प्रकाश आंबेडकर यांनी संभाजी राजे आणि उदयन राजे यांच्यावर नाव न घेता टीका केली होती. दोघांपैकी एकाही राजाचा बंदला पाठिंबा असल्याचे मी ऐकले नाही. एक राजा बिनडोक आहे, तर दुसऱ्याला इतर विषयांमध्येच रस आहे, असे आंबेडकर म्हणाले होते.
याबाबत दोन्ही छत्रपतींना मानणाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. आंबेडकरांच्या प्रतिक्रिये नंतर गृहराज्यमंत्री शंभुराज देसाई यांनी, छत्रपती घराण्याचे वंशज खासदार उदयनराजे भोसले यांच्याबद्दल केलेले वक्तव्य निंदनीय असून, संपूर्ण राज्यात छत्रपतींच्या गादीला मानणारे लोक आहेत. साताराच्या गादीचा अवमान खपवून घेतला जाणार नाही. त्यांच्यावरील टीका कदापी सहन केली जाणार नाही, अशा शब्दात आपली प्रतिक्रिया व्यक्त केली होती.
हेही वाचा-साताऱ्यातील जम्बो कोविड रुग्णालयाचे मुख्यमंत्र्यांनी केले ऑनलाईन उद्धघाटन