सातारा- ट्रक चालकाच्या अपघाती मृत्युमुळे समोरच्या ट्रकचा मालक आणि विमा कंपनीकडून 81 लाख अधिक 7 टक्के दराने व्याज अशी एकूण 1 कोटी 15 लाख इतकी नुकसान भरपाई देण्याचा आदेश जिल्हा न्यायालयाने दिला आहे. ही रक्कम जिल्ह्याच्या आजपर्यंतच्या न्यायालयीन इतिहासातील सर्वोच्च नुकसान भरपाई आहे.
मृत ट्रक चालक-मालक संजय सखाराम पवार (रा. परखंदी, ता. माण) यांच्या वारसांतर्फे नुकसान भरपाईच्या दाव्याचे काम अॅड. राजेंद्र वीर यांनी पाहिले. त्यांनी सांगितले की, संजय पवार यांनी सन 2008 मध्ये 10 चाकी कंटेनर ट्रक फायनान्स कंपनीच्या कर्जाने विकत घेतला होता. अपघात होईपर्यंत संजय यांनी दरमहा रुपये 35,000 इतका हप्ता वेळच्या वेळी फेडला होता. संजय यांचे कुटुंब कळंबोली, मुंबई येथे भाड्याच्या घरात राहत होते. संजय यांची मुले तेथेच शिक्षण घेत होती. या सर्व बाबींचा विचार करून संजय यांचे उत्पन्न दरमहा रुपये 66 हजार इतके होत असल्याने एकूण 1 कोटी 44 लाख रुपये नुकसान भरपाई मिळण्याची मागणी पवार कुटुंबीयांतर्फे करण्यात आली होती.