सातारा- कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी विविध पातळीवर उपाय योजना सुरू आहेत. सातारा जिल्ह्यात 'कोरोना'चा कोणताही प्रार्दुभाव नाही, तरीसुद्धा काळजी व सतर्कता बाळगावी. खबरदारी म्हणून नागरिकांनी गर्दीची ठिकाणे टाळावीत व नियोजित सार्वजनिक कार्यक्रम तातडीने रद्द करावेत, असे सतर्कतेचे आवाहन जिल्हाधिकारी शेखर सिंग यांनी केले आहे.
हेही वाचा -सातारा जिल्हा बँक फोडण्याचा प्रयत्न.. मात्र, चोरट्यांचा डाव फसला
कोरोनामध्ये खोकला, श्वास घेण्याचा त्रास, न्यूमोनिया, ताप इत्यादी लक्षणे दिसतात. त्याचा प्रसार हवेवाटे, त्रस्त व्यक्तींची शिक अथवा खोकला यांच्या संपर्कात आल्यास आजाराचा प्रसार होतो. कोरोना आजारात 3 ते 5 टक्के लोकांना रुगणालयात भरती करावे लागते. काळजी आणि सतर्कता महत्त्वाची आहे. नागरिकांनी नियमितपणे साबणाने हात स्वच्छ धुवावेत, हात धुण्याच्या 7 पद्धती वापराव्यात, शिंकताना तोंडावर रूमाल वापरावा व नागरिकांनी गर्दीची ठिकाणे टाळावीत. महिला दिनानिमित्त आयोजित सामूहिक कार्यक्रम, शाळांचे स्नेहसंमेलन, यात्रा जत्रांसारखे कार्यक्रम संयोजकांनी तातडीने रद्द करावेत, असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले.
- जिल्हा रुग्णालयात स्वतंत्र कक्ष -
सातारा जिल्हा रुग्णालयात 6 खाटचा विलगीकरण कक्ष तयार करण्यात आला आहे. 1 वैद्यकीय अधिकारी व 5 सहाय्यक या कक्षासाठी सज्ज राहणार असल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी सांगितले. इराण व हॉगकाँग येथून आलेल्या 2 रुणांची तपासणी करण्यात आली आहे. मात्र, त्यांच्यात कोणतीही लक्षणे आढळून आली नाहीत. 2 उपजिल्हा रुग्णालये व 72 प्राथमिक आरोग्य केंद्र यांना सतर्कतेच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच सातारा जिल्हयातील 5 खासगी रुग्णालयांना स्वतंत्र कक्ष तयार ठेवण्याची विनंती करण्यात आली आहे. आयएमए, मेडिकल प्रॅक्टिशनर्स, व प्रायव्हेट रुग्णालय यांची कार्यशाळा शुक्रवारी घेतली जाणार आहे, असेही डॉ गडीकर यांनी सांगितले. नागरिकांनी टोल फ्री क्रमांक 104 व 238494, 230051 येथे संपर्क साधावा, असे आवाहन डॉ. आमोद गडीकर यांनी केले आहे.
हेही वाचा -दाभोलकर हत्या प्रकरण : पिस्तूल सापडले ना? मग गुन्हेगारांनाही लवकर शोधा'