सातारा - लॉकडाऊनमध्ये शिथिलता दिल्यानंतर सर्व आस्थापना उघडण्यासाठी परवानगी देण्यात आली होती. परंतु, बहुतांश नागरिकांनी सोशल डिस्टन्सिंगचे पालन न केल्यामुळे बाजारपेठेत अनावश्यक गर्दी होत आहे. त्यामुळे पुढील धोका टाळण्यासाठी 5 हजारापेक्षा जास्त लोकसंख्येच्या ग्रामपंचायत कार्यक्षेत्रात विषम तारखांना दुकाने सुरू ठेवण्याचे आदेश सातारा जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी दिले आहेत.
जिल्हाधिकारी शेखर सिंह यांचे निवेदन जिल्ह्यातील 66 गावामध्ये विषम तारखांना दुकाने सुरू ठेवण्याबाबतचे आदेश जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी जारी केले आहेत. आदेशानुसार 66 ग्रामपंचायत हद्दीतील हॉस्पिटल्स, नर्सिग होम व खासगी डॉक्टरचे क्लिनिक (ओपीडी) 24 तास सुरु ठेवण्यास मुभा आहे. ग्रामपंचायत हद्दीतील किरणा दुकाने, औषधांची दुकाने (मेडिकल) शेती संबंधी औषधांची दुकाने, खते व बी-बियाणांची दुकाने दररोज सकाळी 9 ते सायंकाळी 6 या वेळेतच सुरु ठेवावीत. उर्वरित सर्व प्रकारच्या आस्थापना, दुकाने केवळ विषम तारेखस सकाळी 11 ते दुपारी 4 या वेळेतच चालू राहतील. ग्रामपंचायत हद्दीतील मद्यविक्री जिल्हाधिकाऱ्यांच्या अटींच्या अधिन राहून सुरु ठेवण्यास मुभा देण्यात आलीय.
83 पैकी 81 सौम्य कोरोनाबाधित
सातारा जिल्ह्यात 124 कोरोनाचे रुग्ण निष्पन्न झाले होते यापैकी दोघांचा सुरुवातीलाच दुर्दैवाने मृत्यु झाला आहे. 39 रुग्ण उपचार घेऊन बरे झाले आहेत. 83 बाधित उपचार घेत आहेत. यातील 81 बाधित 'अ' प्रवर्गातील सौम्य बाधा किंवा सौम्य लक्षणे असलेले आहेत. त्यामुळे नागरिकांनी घाबरुन न जाता विषाणूचा प्रसार वाढणार नाही याची काळजी घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी केले आहे.
तालुकानिहाय मोठी गावे
- सातारा- लिंब, खेड, शाहुपूरी, कोडोली, संभाजीनगर, देगाव, नागठाणे, अतित, काशिळ
- कोरेगाव- कुमठे, पाडळी स्टेशन, पिंपोडे बु, वाठार (किरोली), वाठार स्टेशन.
- माण- पळशी, गोंदवले बु, बिदाल.
- फलटण -आसू, विडणी, कोळकी, गुणवरे, बरड, गिरवी, सांगवी, पाडेगाव, तरडगाव, साखरवाडी (पिंपळवाडी).
- खंडाळा- शिरवळ
- वाई - बावधन, भुईंज, ओझर्डे, पसरणी, यशवंतनगर.
- जावली - कुडाळ.
- कराड -आटके, ओंड, उंब्रज, बनवडी, चरेगाव, गोळेश्वर, काले, कार्वे, विंग, कोपर्डे हवेली, मसूर, मुंढे, पाल, रेठरे बु, सदाशिवगड, सैदापूर, शेरे, तांबवे, वडगाव हवेली, वारुंजी.
- खटाव- बुध, खटाव, पुसेगाव, चितळी, मायणी, कलेढोण, कुरोली (सिद्धेश्वर), निमसोड, पुसेसावळी, औंध
- पाटण- तारळे