कराड (सातारा) - राज्यातील मानद वन्यजीव रक्षकांशी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधला. यावेळी वन्यजीव रक्षकांनी मुख्यमंत्र्यांकडे दहा मागण्या केल्या आहेत. मुख्यमंत्र्यांसह वन राज्यमंत्री दत्तात्रय भरणे, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, प्रधान सचिव विकास खारगे, वन विभागाचे प्रधान सचिव वेणूगोपाल रेड्डी, वन बल प्रमुख साई प्रकाश, प्रधान मुख्य वन संरक्षक (वन्यजीव) नितीन काकोडकर हे यावेळी उपस्थित होते.
मानद वन्यजीव रक्षकांनी मुख्यमंत्र्यांकडे केल्या या मागण्या
जोर जांभळी, विशाळगड, पन्हाळा, चंदगड, आंबोली-दोडामार्ग, तिलारीवरील संवर्धन राखीव म्हणून घोषित केलेल्या प्रकल्पातील अधिकारी, कर्मचार्यांना वन्यजीव विभागाकडे हस्तांतर करावे. विदर्भातील गोरेवडा आंतरराष्ट्रीय प्राणी संग्रहालयाच्या धर्तीवर शासनाने पर्यटन, महसूल, रोजगार वाढविण्यासाठी पश्चिम घाटात कोयनानगर परिसरात एखादे प्राणी, सर्प संग्रहालय आणि निसर्ग अध्यन केंद्र सुरू करावे. गोव्याचे पर्यटक सिंधुदुर्ग, आंबोली परिसरात येण्यासाठी करावेत. सिंधुदुर्ग व रत्नागिरी भागातील 70 टक्के जंगल हे खाजगी क्षेत्रात आहे. केरळमधील लोक तेथील जागा मोठ्या प्रमाणात विकत घेत आहेत. जंगल नष्ट करून त्या जागेवर रबर वृक्ष व अननसाची लागवड करत आहेत. त्यामुळे पश्चिम घाटातील पर्यावरण धोक्यात आले आहे. वन्यजीव विभागात कर्नाटकच्या धर्तीवर फ्रंटलाइन स्टाफसाठी वन स्टेप हायर पेमेंट सुरू करावे, राज्यातील सर्व विभागांमध्ये वन्यजीव अपराध नियंत्रण ब्युरो सुरू करावेत. सहायक वनसंरक्षक (कायदा व अपराध) हे पद प्रत्येक विभागात सुरू करावे, कराडमधील वराडे येथे वन्यप्राण्यांसाठी अद्ययावत ट्रीटमेंट व ट्रांझीट सेंटर मंजूर झाले आहे. त्यासाठीच्या खर्चासाठी 2 कोटी रूपयांचे अनुदान मंजूर करावे, कराड हे सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, रत्नागिरी, चिपळूणसाठी मध्यवर्ती व राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 4 वर आहे. वराडे (कराड) येथे ट्रीटमेंट व ट्रांझीट सेंटर सुरू झाल्यास पुणे व बोरिवलीतील सेंटरवरील ताण कमी होईल. कोयनानगर येथील शिवसागर जलाशयात बोटिंग त्वरित सुरू करावे. त्यासाठी गृह विभागाला आदेश द्यावेत. शेतीसाठी दिलेल्या बंदूक परवान्यांवर शासनाने पुनर्विचार करावा. सांगलीतील कृष्णा नदीत मगरीचा वास आहेत. सातारा जिल्ह्यातील कृष्णा नदीतही मगरी दिसत आहेत. याचा शास्त्रीय अभ्यास करावा. इत्यादी मागण्या करण्यात आल्या आहेत.