सातारा CM Eknath Shinde: मनोज जरांगेंनी मराठा आरक्षणासाठी सुरू केलेल्या आमरण उपोषणानंतर राज्यात झालेल्या उद्रेकामुळं सरकारची दमछाक झाली होती. आता जरांगेंनी आमरण उपोषण थांबवताच मुख्यमंत्र्यांनी थेट आपले गाव गाठलं आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शुक्रवारी दुपारी हेलिकॉप्टरनं महाबळेश्वर तालुक्यातील दरेगावात दाखल झाले आहेत.
सुस्कारा टाकून मुख्यमंत्री गावी दाखल : मराठा आरक्षणाच्या मुद्यावरून राज्यातील वातावरण चांगलच तापलेलं होतं. मनोज जरांगे-पाटील यांनी आरक्षणाची मागणी लावून धरत आमरण उपोषण सुरु केल्यानं सरकारची दमछाक झाली होती. मात्र, शुक्रवारी जरांगेंनी सरकारला आरक्षणासाठी मुदत देत आपलं आमरण उपोषण स्थगित केलं. त्यामुळं मुख्यमंत्र्यांनी सुटकेचा निःश्वास टाकला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज अचानक महाबळेश्वर तालुक्यातील दरे या आपल्या मूळगावी दाखल झाले आहेत. ते गावात दोन दिवस राहणार आहेत.
प्रशासकीय अधिकाऱ्यांनी केले स्वागत :दरेगावातील हेलिपॅडवर मुख्यमंत्र्यांच्या हेलिकॉप्टरचं लॅंडींग झाल्यानंतर जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी, पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी मुख्यमंत्र्यांचं स्वागत केलं. मुख्यमंत्री शिंदे हे सातारा जिल्ह्यात विविध ठिकाणी आज, उद्या भेटी देणार आहेत. तसंच अनेक महत्वाच्या विषयांवर प्रशासकीय बैठका देखील घेणार असल्याची माहिती मिळत आहे.