सातारा -काँग्रेस, राष्ट्रवादीला प्रचारासाठी भाडोत्री माणसं आणावी लागतात, असे म्हणत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आघाडीवर निशाणा साधला. साताऱ्यात आलेल्या रेल्वे इंजिनची तर आम्ही विधानसभा निवडणुकीतच बॅटरी काढली होती. तेच बंद पडलेले इंजिन राष्ट्रवादीने आणले असल्याचे म्हणत मुख्यमंत्र्यांनी राज ठाकरेंनाही टोला लगावला. ही निवडणूक गल्लीची नसून दिल्लीची असल्याचेही मुख्यमंत्री म्हणाले.
सातारा येथील गांधी मैदानावर शिवसेनेचे उमेदवार नरेंद्र पाटील यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत फडणवीस बोलत होते. यावेळी राज्य सहकार परिषदेचे अध्यक्ष शेखर चरेगावकर, उमेदवार नरेंद्र पाटील, पुरुषोत्तम जाधव, माजी आमदार मदन भोसले, माजी आमदार सदाशिवराव सपकाळ उपस्थित होते.