सातारा - कराड नगरपालिकेने सामाजिक संस्था आणि शालेय विद्यार्थ्यांच्या सहभागातून कृष्णा नदी काठावर स्वच्छता अभियान राबवले. यामुळे हा परिसर स्वच्छ आणि सुंदर दिसू लागला आहे. या अभियानामार्फत ९ ट्रॉली कचरा गोळा करण्यात आला.
हेही वाचा - महिला शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवणाऱ्या सावित्रीबाईंना भारतरत्न द्या - नवनीत राणा
छावसाळा आणि कोयना धरणातून सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे कृष्णा नदीच्या वाळवंटात कचरा साचला होता. यामुळे पाणी प्रदुषित होण्याचा धोका होता. हे टाळण्यासाठी स्वच्छ सर्वेक्षणामध्ये देशात नावलौकीक मिळवलेल्या कराड नगरपालिकेने स्वच्छता अभियान हाती घेतले. नगरपालिकेचे मुख्याधिकारी यशवंत डांगे यांच्या उपस्थितीत शहरातील लाहोटी कन्या शाळा, संत तुकाराम हायस्कूल, यशवंत हायस्कूल, शाहीन उर्दू स्कूल, शाहीन ई स्कूल, एच. के. डी ऊर्दू स्कूल, नूतन मराठी शाळा, पालकर शाळा, केशवराव पवार इंग्लिश मिडीयम स्कूलमधील शेकडो विद्यार्थ्यांनी शिक्षकांसमवेत कृष्णा नदी परिसर स्वच्छ केला. नगरपालिकेच्या आरोग्य कर्मचार्यांनीही यात सहभाग घेतला होता.