सातारा - ठिकठिकाणी सोडलेले सांडपाणी, जागोजागी पाण्यात टाकला जाणारा कचरा, यासह मरुन पडणारे भटके प्राणी, प्रवाह नसताना साठणारी डबकी असे काहीसे चित्र सातारा शहरातून वाहणाऱ्या कालव्यामध्ये पाहायला मिळत आहे. हा कालवा सध्या घाणीचे आगार बनला आहे. परिणामी परिसरातील नागरिकांच्या आरोग्यासाठी धोक्याची घंटा ठरत आहे.
सांडपाण्यामुळे साताऱ्याच्या सार्वजनिक आरोग्यात 'कालवा'कालव ! - canal water pollution
अनेकदा या कालव्यात पाण्याचा प्रवाह नसतो तेंव्हा भटकी जनावरे मरुन पडलेली दिसतात. मागासवस्त्यांमधील तसेच ग्रामीण भागातही लोक या कालव्यामध्ये कपडे धुतात. त्यामुळे या कालव्यात जलप्रदुषणाचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. परिणामी या परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता बळावली आहे.
सांडपाणी आणि कचरा
सातारा शहरात करंजे येथे कण्हेर उजवा कालवा प्रवेश करतो. तो दौलतनगर, सदरबझार, लक्ष्मी टेकडी, खेड येथून कोडोलीकडे जातो. ग्रामीण भागात सिंचनासाठी पाटबंधारे विभागाचा हा कालवा गेला आहे. या कालव्यात ठिकठिकाणी पर्याय नसल्याने शहरालगतच्या उपनगरांतील सांडपाणी सोडलेले पहायला मिळते. दौलतनगर, सदरबझार चौकाजवळ सरळसरळ थेट कालव्या सांडपाणी जात असल्याचे दिसते. लक्ष्मी टेकडीसह अनेक ठिकाणी कालव्यालगतच कचऱ्याचे ढीग दिसतात. त्यातच भटकी जनावरे फिरताना दिसतात. अनेकदा या कालव्यात पाण्याचा प्रवाह नसतो तेंव्हा भटकी जनावरे मरुन पडलेली दिसतात. मागासवस्त्यांमधील तसेच ग्रामीण भागातही लोक या कालव्यामध्ये कपडे धुतात. त्यामुळे या कालव्यात जलप्रदुषणाचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे.
कालवा बंदीस्त करावा - स्नेहा नलवडे
सदरबझारमधील नगरसेविका स्नेहा नलवडे यांच्या ईटीव्ही भारतने संवाद साधला असता, त्या म्हणाल्या की "आमच्या वाॅर्डमधून कण्हेर उजवा कालवा जातो. या कालव्यात वरच्या बाजूला ठिकठिकाणी सांडपाणी सोडले जाते. त्यामुळे कालव्यातील पाणी दूषित होत आहे. खरेतर या कालव्याच्या शहरातून जाणाऱ्या भागात पाईपलाईन टाकूण तो बंदीस्त केला पाहिजे. तसेच स्थानिक प्रशासनाने कालवा दूषित करणाऱ्यांवर कारवाई केली पाहिजे. दूषित पाण्याचे प्रमाण वाढल्यास भविष्यात आरोग्याच्या अनेक समस्या निर्माण होण्याचा धोका आहे."
साठणारे पाणी रोगराईस निमंत्रण
कालवा प्रवाही नसतो तेंव्हा सांडपाणी साचून डांसाच्या उत्पत्तीस निमंत्रण मिळते. त्यातून लगतच्या झोपडपट्ट्यांत साथरोग पसरण्याचा धोका असल्याचे स्थानिक रहिवासी जावेद सय्यद यांनी 'ईटीव्ही भारतशी' बोलताना सांगितले.
आरोग्यावर घातक परिणाम संभवतो
सांडपाणी मिश्रीत पाण्याचा शेतीपिकावर दिर्घकालीन परिणाम संभवतात. त्याचबरोबर शेतजमिनीच्या उगवण क्षमतेवरही परिणाम संभवतो, असे पर्यावरण तज्ज्ञ विजय औताडे यांनी सांगितले. कोरोनाच्या रुग्णांची टाकून दिलेले कपडे, औषधे या पाण्यात मिसळले तर त्याचे घातक परिणाम समाजाच्या आरोग्यावर संभवतो. कळत नकळत या सांडपाणी मिश्रीत पाण्याचा पिण्यासाठी वापर झाल्यास काॅलरा, काविळीसारखे गंभिर आजार होऊ शकतात, असेही त्यांनी स्पष्ट केले.