सातारा - चिकनमुळे कोरोना होतो या अफवेमुळे, मार्च-एप्रिल महिन्यांमध्ये पोल्ट्री व्यवसायिकांचे कंबरडे मोडले होते. मात्र मे महिन्यात कुणी कोंबडी देता का? असे म्हणायची वेळ चिकनप्रेमींवर आली आहे. मागणी जास्त व पुरवठा नगण्य यामुळे गावठी कोंबड्या पाचशे रुपयांना एक तर बाॅयलर चिकन तब्बल अडीचशे रुपये किलोने विकले जात आहे.
कोरोनाने मार्च महिन्यात भारतात हातपाय पसरायला सुरुवात केली. याकाळात चिकन खाल्ल्यामुळे कोरोना होतो, ही अफवा समाज माध्यमावर पसरली आणि चिकन व्यवसायिकांचे धाबे दणाणले. अफवेमुळे चिकनविक्री ठप्प झाली, दर गडगडले. दोन ते तीन किलोच्या कोंबड्या फक्त ५० रुपयांना विकण्यात आल्या. काही ठिकाणी तर फुकटही कोंबड्या दिल्या गेल्या. काही जणांनी लहान पिल्ले अक्षरश: पुरून टाकली किंवा रानोमाळ सोडून दिली. एका अफवेमुळे पोल्ट्री व चिकन व्यवसायिकांचे कोट्यवधींचे नुकसान झाले.
तशात चारकमानी मंडळी मोठ्या प्रमाणात गावी आल्यामुळे पार्ट्यांचे प्रमाण वाढले आहे. त्यांनी मिळेल त्या भावाने गावठी कोंबड्या घेऊन त्या फस्त केल्या. जे बोकडाच्या मटणाचे शौकीन आहेत, त्यांनी अख्खे बोकड कापण्याचा सपाटा लावला आहे.