सातारा - पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर वाढेफाटा येथे हॉटेल विठ्ठल कामत नजीक केमिकलने भरलेला टेम्पो अचानक पलटी झाला. त्यामुळे गाडीमधील रसायन रस्त्यावर सांडून हवेमध्ये पसरले. टेम्पो पलटी झाल्याने दोघेजण गंभीर जखमी झाले. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात हलविण्यात आले आहे.
केमिकल रस्त्यावर सांडल्याने परिसरात उग्र वास
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, काल (30 मे) सायंकाळच्या सुमारास हा प्रकार घडला. कोणतेतरी रसायन घेऊन निघालेला टेम्पो वाढेफाट्याजवळ पलटी झाला. अपघातग्रस्त टेम्पोतून केमिकल रस्त्यावर सांडले. त्यामुळे परिसरात उग्र वास पसरला होता. नागरिकांच्या डोळ्यात आणि नाकात झिणझिण्या येत होत्या. सातारा पालिकेच्या आणि क्रेनच्या सहाय्याने टेम्पो बाजूला करण्यात आला. तरीही त्यातून तांबड्या रंगाचा वायू बाहेर पडत होता. केमिकल कोणते आहे, याची माहिती घेण्याचे काम सुरू आहे.