सातारा -जिल्ह्यातील हिंगणे येथील अजय चंद्रकांत यादव (वय 42) यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी वडूज पोलीस ठाण्यात 13 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान 13 पैकी पाच जणांना अटक करण्यात आली असून, त्यांना न्यायलयाने 5 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
खोट्या केसमध्ये अडकवण्याची धमकी
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हिंगणे येथील अजय यादव यांनी त्यांच्या ओळखीतील लोकांना विविध कारणांसाठी एकूण 19 लाख 95 हजार रुपये दिले होते. मात्र संबंधितांनी त्यांचे पैसे न देता उलट त्यांनाच खोट्या केसमध्ये अडकवण्याची धमकी दिली. त्यामुळे अजय यादव यांनी 31 मार्च रोजी सकाळी सात वाजण्याच्या सुमारास हिंगणे गावातील लिंबाच्या झाडाला दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली.
पोलिसांना सापडली सुसाईड नोट
पोलिसांना अजय यादव यांच्या पँटच्या खिशामध्ये चिठ्ठी आढळून आली असून, त्यात त्यांनी लोकांनी दिलेले पैसे दिले नाहीत, तसेच वाहने देखील परत न केल्याने आत्महत्या करत असल्याचे म्हटले आहे. याप्रकरणी अजय यादव यांचे वडील चंद्रकांत दत्तू यादव यांनी दिलेल्या फिर्यादीवरून 13 जणांवर गुन्हा दाखल झाला आहे. इमरान सिकंदर बागवान (वडूज ता. खटाव), विलास दादासो शिंगाडे (कातरखटाव ता खटाव), सुनील रामचंद्र गायकवाड (वडूज ता खटाव), धनाजी पाटोळे (वडूज ता खटाव), विश्वास बागल (वडूज ता खटाव), बाळू मासाळ (वडूज ता खटाव), रवींद्र आनंदराव राऊत (गणेशवाडी ता खटाव), वैभव संभाजी पवार (हिंगणे ता खटाव), जालिंदर चंद्रकांत खोडे (वडूज ता खटाव), पिनु पवार (उंबर्डे ता खटाव), चंद्रकांत जगदाळे (पेडगाव), अमित पिसे (म्हसवड), अमोल कलढोणे (म्हसवड) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान यापैकी इमरान सिकंदर बागवान (38), विलास शिंगाडे (वय 43) सुनील गायकवाड (वय 50), जालिंदर खुडे (वय 37) व रवींद्र राऊत (वय 50) यांना वडूज पोलिसांनी अटक केली आहे. त्यांना सोमवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
हेही वाचा -नाशकात बेड न मिळाल्याने केले आंदोलन, कोरोना रुग्णाचा हकनाक गेला जीव