सातारा Chandrashekhar Bawankule On Congress : काॅंग्रेस पार्टी म्हणजे ब्लड कॅन्सर असून काॅंग्रेसच्या रक्तात कन्फ्यूज करण्याचं राजकारण असल्याची घणाघाती टीका भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी साताऱ्यातील कार्यक्रमात बोलताना केलीये. कॉंग्रेसनं कन्फ्युज केलेल्या लोकांना आम्ही कन्व्हेन्स करायला चाललोय, असेही बावनकुळे म्हणालेय.
कॉंग्रेसने लोकांना कन्फ्यूज केलं : मेरी माटी मेरा देश, सुपर वॉरिअर्सशी संवाद आणि घर चलो अभियानासाठी सातारा जिल्हा दौऱ्यावर आले, असता चंद्रशेखर बावनकुळेंनी कॉंग्रेसवर जोरदार टीका केली आहे. कॉंग्रेसनं गेली ६५ वर्षे लोकांना डेव्हलपमेंटचं काही सांगितलं नाही. फक्त लोकांना कन्फ्यूज केलंय. तसंच कन्फ्यूज झालेल्यांना कन्व्हेन्स करण्यासाठी आम्ही बाहेर पडलोय, असंही बावनकुळे म्हणाले आहेत.
महायुतीत भाजपच मोठा भाऊ :पुढं बोलत असताना बावनकुळे म्हणाले की, एकनाथ शिंदे हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून सरकारचे प्रमुख आहेत. हे कुणीच नाकारू शकत नाही. २०२४ पर्यंत तेच मुख्यमंत्री राहतील. परंतु, महायुतीमध्ये भाजपचे सर्वाधिक आमदार, खासदार असल्यानं महायुतीमध्ये भाजपच ‘मोठा भाऊ’ आहे, असा दावाही त्यांनी केलाय.