सातारा - ठोसेघर-चाळकेवाडी मार्गावर सज्जनगड फाट्याच्या पुढे असलेल्या वळणावर रस्ता खचला आहे. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक ठप्प होण्याच्या मार्गावर आहे.
साताऱ्यातील चाळकेवाडीचा रस्ता खचला, अनेक ठिकाणी भेगा - Heavy rain
डोंगर दऱ्यातून वाहत येणारे पाणी चाळकेवाडीच्या रस्त्यावरुन वाहत आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी रस्त्यांना भेगा पडल्यामुळे हा रस्ता खचला आहे.
परळी ठोसेघर परिसरात आज सकाळपासून पावसाचा जोर वाढला असून ओढे-नाले दुथडी भरुन वाहत आहेत. ठोसेघर मार्गावरही डोंगर दऱ्यातून वाहत येणारे पाणी रस्त्यावरुन वाहत आहे. त्यामुळे या ठिकाणचा रस्ता खचला आहे. या रस्त्याचा काही भाग सकाळीच पडला होता. मात्र, वाहनधारक त्याकडे दुर्लक्ष करत होते. सायंकाळी उशिरा अंधार पडण्याच्या वेळेस साडे सहाच्या सुमारास या रस्त्याचा आणखी काही भाग खाली कोसळला. यावेळी वाहनधारकांनी तत्काळ वाहने थांबवून या मार्गावर दगड लावून येणा-जाणाऱ्यांना हा रस्ता खचल्याची माहिती दिली. रात्री उशिरापर्यंत पावसाचा जोर असाच राहिला तर हा रस्ता खचून या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे थांबेल, अशी परिस्थिती सध्या याठिकाणी निर्माण झाली आहे.
पावसाळ्यातील ३ महिने या मार्गावर रस्त्यावरुन पाणी वाहत असल्याने रस्त्याकडेला नाले खुदाई करणे गरजेचे होते. जेणेकरुन पाण्याचा प्रवाह कमीत कमी रस्त्यावरुन वाहत खाली गेला असता. मात्र, यावर्षी नाले खुदाई न केल्याने डोंगरावरुन येणारे पाणी आणि दगड रस्त्यावरच वाहत आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी रस्त्यांना भेगा पडल्यामुळे हा रस्ता खचला आहे. बांधकाम विभागाने याकडे तात्काळ लक्ष देणे गरजेचे आहे, नाहीतर या ठिकाणी मोठी दुर्घटना घडू शकते, अशी शक्यता स्थानिकांनी व्यक्त केली.