महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

विजापूर-गुहागर महामार्गावर सीसीटीव्ही कॅमेर्‍यांची नजर - विजयनगर ग्रामपंचायत कराड

सध्या या महामार्गाचे विस्तारीकरण आणि काँक्रीटीकरण झाले आहे. भरधाव वाहनांमुळे गेल्या सहा महिन्यात या मार्गावर अनेक भीषण अपघात घडले आहेत. अपघात करून घटनास्थळावरून पलायन केलेल्या अनेक वाहनांचा शोध लावता आलेला नाही. परंतु, आता अशा घटनांचा सीसीटीव्हीमुळे उलगडा करणे सोपे होणार आहे.

कराड
कराड

By

Published : Mar 21, 2021, 4:12 PM IST

कराड (सातारा)- तालुक्यातील विजयनगर ग्रामपंचायतीने स्वखर्चातून गावात आणि विजापूर-गुहागर महामार्गावर १५ सीसीटीव्ही कॅमेरे बसविले आहेत. त्यामुळे गावातील आणि महामार्गावरील हालचालींवर चोवीस तास सीसीटीव्ही कॅमेर्‍यांची नजर राहणार आहे. सर्व घटना सीसीटीव्हीत कैद होणार असल्याने पोलीस प्रशासनाला तपासाच्या दृष्टीने मदत होणार आहे.

कराड

विजयनगर गाव विजापूर-गुहागर महामार्गावर आहे. तसेच गावापासून शंभर फुटांवर कराडचे आरटीओ (प्रादेशिक परिवहन) कार्यालय आहे. विजापूर-गुहागर मार्गाने कोकणात प्रवेश करता येतो. रायगड, रोहा, लोटे (चिपळूण) या ठिकाणी एमआयडीसी तसेच रासायनिक कंपन्या आहेत. परिणामी अवजड वाहनांची या महामार्गावर सतत वर्दळ असते. पर्यटनासाठी कोकणात जाणार्‍या पर्यटकांमुळेही या महामार्गावरील दळणवळण वाढली आहे. सध्या या महामार्गाचे विस्तारीकरण आणि काँक्रीटीकरण झाले आहे. भरधाव वाहनांमुळे गेल्या सहा महिन्यात या मार्गावर अनेक भीषण अपघात घडले आहेत. अपघात करून घटनास्थळावरून पलायन केलेल्या अनेक वाहनांचा शोध लावता आलेला नाही. परंतु, आता अशा घटनांचा सीसीटीव्हीमुळे उलगडा करणे सोपे होणार आहे.

गुन्हेगारांना पकडणेही शक्य होणार

कराडपासून पाच कि. मी. अंतरावरील विजयनगर गाव कराड शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत आहे. दिवस-रात्र विजयनगरपर्यंत पोलिसांची गस्त सुरू असते. परंतु, अपघात, चोरी, दरोड्यासारख्या गंभीर घटनांमधील संशयितांच्या हालचाली सीसीटीव्ही कॅमेर्‍यांमध्ये कैद होऊ शकणार आहेत. तसेच गुन्हेगारांना पकडणेही शक्य होणार आहे. आरटीओ कार्यालयामुळे विजयनगर परिसरात अनेक उद्योग-व्यवसाय उभे राहिले आहेत. कराडपासून जवळ असल्यामुळे विजयनगरमध्ये बाहेरील लोक स्थायिक झाले आहेत. नागरीकरण वाढल्यामुळे गुन्ह्यांचे प्रमाणही वाढत गेले. तसेच वारूंजी फाटा ते विजयनगर हद्दीत हॉटेल्स, ढाब्यांची संख्याही मोठी आहे. या सर्व बाबी विचारात घेऊन विजयनगर ग्रामपंचायतीने सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचा निर्णय घेत १५ कॅमेरे बसविले आहेत. सातार्‍याचे जिल्हाधिकारी शेखर सिंह आणि पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल यांच्या हस्ते नुकतेच सीसीटीव्ही यंत्रणेचे उद्घाटन झाले. पोलीस प्रशासनाला या यंत्रणेमुळे मदत होणार असल्याची प्रतिक्रिया शेखर सिंह आणि अजय कुमार बन्सल यांनी व्यक्त केली.

माजी आमदार आनंदराव पाटील यांच्या नेतृत्वाखाली विजयनगर ग्रामपंचायत एकसंघपणे कारभार करते. शासकीय योजनांची प्रभावी अंमलबजावणी केली जाते. विजयनगर गाव महामार्गाच्या जवळ असल्याने अपघात तसेच गुन्हेगारी घटनांमध्ये प्रशासनाला तपासात मदत व्हावी, या हेतूने सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले असल्याचे बाजार समितीचे संचालक सुनील पाटील यांनी ईटीव्ही भारतशी बोलताना सांगितले.

ABOUT THE AUTHOR

...view details