महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

जिल्हाधिकारी कार्यालयातील लेखाधिकाऱ्याकडून 13 लाखांचा अपहार; गुन्हा दाखल - सातारा गुन्हे बातमी

सातारा तहसील कार्यालयात रमेश हा सहायक लेखाधिकारी म्हणून मार्च २०२० अखेरपर्यंत काम करत होता. हा प्रकार 12 जून ते 29 सप्टेबर या कालावधीत घडल्याचे लीपिक विलास मधू पडोळकर यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे.

जिल्हाधिकारी कार्यालयातील लेखाधिकाऱ्याकडून 13 लाखांचा अपहार; गुन्हा दाखल
जिल्हाधिकारी कार्यालयातील लेखाधिकाऱ्याकडून 13 लाखांचा अपहार; गुन्हा दाखल

By

Published : Oct 5, 2020, 12:26 AM IST

सातारा - तहसीलदारांच्या बनावट सह्या करून 13 लाख 65 हजार रुपयांची अफरातफर केल्याप्रकरणी जिल्हाधिकारी कार्यालयात पुरवठा शाखेत काम करणारा सहाय्यक लेखाधिकारी रमेश वसावे याच्यावर पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. रमेश जामू वसावे (वय ४०, रा. संगमनगर सातारा) असे गुन्हा दाखल झालेल्या अधिकाऱ्याचे नाव आहे. सातारा तहसील कार्यालयात रमेश हा सहायक लेखाधिकारी म्हणून मार्च २०२० अखेरपर्यंत काम करत होता. हा प्रकार 12 जून ते 29 सप्टेबर या कालावधीत घडल्याचे लीपिक विलास मधू पडोळकर यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे.

तहसीलदार आशा होळकर यांच्या नावावर प्रतापगंज पेठेतील स्टेट बँकेत सरकारी खाते आहे. त्या खात्यावर शासनाकडून विविध योजनांचा निधी जमा होत असतो. दि.२९ सप्टेंबरला लीपिक पडोळकर यांनी बँक खात्यातील विवरण पत्राची प्रिंट काढून पाहिली. त्यामध्ये १ सप्टेंबरला रमेश वसावे याने शासकीय खात्यावर ३ लाख ८५ हजार जमा केल्याचे निर्दशनास आले.

हे पैसे नेमके कोठून आले याची कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी माहिती घेतली असता वसावे याने आपला अपहार उघडकीस येत असल्याचे समजताच बँक खात्यावर पैसे भरण्याचा प्रयत्न केला असल्याचे समोर आले. श्री. पडोळकर यांनी याची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिली. अधिकाऱ्यांनी धनादेशांच्या नोंदी तपासल्या असता ३६९८ या क्रमांकाने सुरू होणारे चेकबूक कार्यालयातून गहाळ होते. वसावे याने संबंधित धनादेश पुस्तक वरिष्ठांनी विश्‍वासाने ताब्यात दिले असता चोरुन नेऊन त्यावर तहसीलदारांची बनावट सही केली. तसेच तहसीलदार यांच्या पदनामाचा शिक्का उमटवून शासनाची फसवणूक करून शासकीय रकमेचा १३ लाखांचा अपहार केला असल्याचे स्पष्ट झाले. रात्री उशिरापर्यंत वसावे याला अटक झाली नव्हती. शासनाच्या पैशावर अधिकाऱ्याने डल्ला मारल्याने महसूल विभागात खळबळ उडाली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details