सातारा :साताऱ्यात बुधवारी खासदार उदयनराजे भोसले आणि शिवेंद्रराजे भोसले यांच्यात मोठा वाद उफाळला होता. उदयनराजे यांनी शिंवेंद्रराजे यांचा कार्यक्रम उधळून लावला होता. त्यामुळे मोठा वाद निर्माण झाला होता. साताऱ्यात खासदार उदयनराजे भोसले आणि आमदार शिवेंद्रराजे भोसले हे आमने-सामने आल्याने मोठा तणाव निर्माण झाला होता.बाजार समितीचे अध्यक्ष विक्रम पवार यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे, की खासदार उदयनराजे भोसले यांच्यासह ५० जण बाजार समितीच्या नियोजित बांधकामाच्या ठिकाणी आले. पोलीस असतानाही त्यांनी विकासाच्या कामास विरोध केला. या जागेत पाय ठेवल्यास खल्लास करीन, अशी उदयनराजेंनी धमकी दिली.
पोकलेनच्या साह्याने कंटेनरची तोडफोड :सातारा शहरालगत असलेल्या खिंडवाडी येथील जागेवरून हा वाद सुरू आहे.घटनास्थळी ठेवलेल्या लोखंडी कंटेनरची पोकलेनच्या साह्याने तोडफोड करून दोन लाख रुपयांचे नुकसान केले आहे. विकासाचे काम करून दिले नाही. उदयनराजेंनी जिवे मारण्याची धमकी दिली, असे विक्रम पवार यांनी तक्रारीत म्हटले आहे. या तक्रारीनुसार उदयनराजेंसह ५० जणांवर गुन्हा दाखल झाला आहे. गर्दी जमवणे, दमदाटी आणि मालमत्तेचे नुकसान केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.