सातारा - पती-पत्नी यांच्यात पैशाच्या कारणावरून सुरू असलेले भांडण सोडवण्यासाठी गेलेल्या भंगार व्यावसायिकावरच प्राणघातक हल्ला करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. भंगार व्यावसायिकाचा खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी सातारा शहर पोलीस ठाण्यात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.
झोपडीच्या जागेचा वाद उफाळला
बबडी उर्फ राकेश चव्हाण आणि फिरोज चव्हाण अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. पोलिसांनी सांगितलं की, सचिन रघुनाथ मोरे (वय 34 रा. गोडोली नाका, शासकीय धान्य गोदामाच्या मागे, गोडोली) हा भंगार व्यवसायिक आहे. त्याच्या झोपडीसमोर तो उभा असतानाच बबली उर्फ राकेश श्रीपत चव्हाण आणि त्याची पत्नी सपना या दोघांचे पैशांच्या कारणावरून भांडण सुरू होते. हे भांडण सोडविण्यासाठी सचिन मोरे तिथे गेला असतानाच तिथे बाजूला असलेला फिरोज चव्हाण 'तू इथे कशाला आला, तुझा काय संबंध' असे म्हणू लागला. दरम्यान बबडी आणि सपना या दोघांचे भांडण सुरू असतानाच सचिन आणि फिरोज या दोघांमध्ये जुन्या झोपडीच्या कारणावरून वाद सुरू झाला.
यावेळी फिरोजने सचिनची पत्नी रेखा हिला 'तुला जिवंत सोडणार नाही, तुझा मर्डर करतो' अशी धमकी देत शिवीगाळ- दमदाटी केली. हा वाद इतका विकोपाला गेला की फिरोज याने सचिनच्या डोक्यात वीट घातली. त्यानंतर तो पुन्हा झोपडीत गेला आणि त्याने लोखंडी रॉड आणून त्याच्या डोक्यात घातला. यात सचिन खाली पडला. हे पाहून फिरोज तेथून पळून गेला.
बबडी उर्फ राकेश याने त्यानंतर सचिनच्या पाठीत कुकरीने तर खांदा आणि छातीवर चाकूने वार करून सचिनला गंभीर जखमी केले. या प्रकरणी सचिनने शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर बबली उर्फ राकेश श्रीपती चव्हाण आणि फिरोज श्रीपाद चव्हाण (दोघेही रा. गोडोली नाका, शासकीय धान्य गोदामाच्या मागे गोडोली) या दोघांवर खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. सहाय्यक पोलीस अधीक्षक अंचल दलाल यांनी घटनास्थळी भेट दिली. या गुन्ह्याचा अधिक तपास उपनिरीक्षक सुहास रोकडे करत आहेत.
भंगार व्यावसायिकाच्या खूनाचा प्रयत्न; दोघांवर गुन्हा दाखल
पती-पत्नी यांच्यात पैशाच्या कारणावरून सुरू असलेले भांडण सोडवण्यासाठी गेलेल्या भंगार व्यावसायिकावरच प्राणघातक हल्ला करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
भंगार व्यावसायिकाच्या खूनाचा प्रयत्न; दोघांवर गुन्हा दाखल