सातारा -पोवई नाक्यावर नव्याने झालेल्या ग्रेड सेपरेटरमध्ये दुचाकीचे जीवघेणे स्टंट करणाऱ्या आणि त्याचा व्हिडिओ इंस्टाग्रामवर टाकणाऱ्या एका तरुणावर कारवाई झाली आहे. सातारा शहर वाहतूक पोलिसांनी याबाबत शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
स्टंटबाजी करणाऱ्या तरुणावर कारवाई केली आहे जानेवारी महिन्यात केला होता स्टंट -
ऋतुराज राजेंद्र करंजे (वय 27, रा. दौलत नगर, सातारा) असे या वाहतूक नियमांचा भंग करणाऱ्या तरुणाचे नाव आहे. त्याने जानेवारी महिन्यात बजाज पल्सर 220 सीसी या बाईकवरून यशवंतराव चव्हाण शास्त्र महाविद्यालय ते एसटी स्टँड मार्गातील भुयारी मार्गत रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास स्टंटबाजी केली होती. मित्राच्या मदतीने त्याचे चित्रीकरण करून ते इंस्टाग्रामवर पोस्ट केले होते.
पोलिसांनी घेतले ताब्यात -
सातारा शहर वाहतूक नियंत्रण शाखेच्या ही बाब लक्षात आल्यानंतर त्यांनी स्टंटबाजी करणाऱ्या तरुणाला ताब्यात घेतले. त्याच्यावर सातारा शहर पोलीस ठाण्यात मोटार वाहन कायदा 1988 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांचे तरुणांना आवाहन -
दुचाकीधारकांनी आपले वाहन चालवत असताना अशा प्रकारची स्टंटबाजी, ट्रिपल सीट फिरणे, मोबाईल टॉकिंग अशा प्रकारच्या वाहतुकीच्या नियमांकडे दुर्लक्ष करून वाहन चालवू नये. अन्यथा आपल्यावर सुद्धा अशा प्रकारची कडक कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशारा शहर वाहतूक शाखेचे सहाय्यक निरीक्षक विठ्ठल शेलार यांनी दिला.